सेनेचे भावी महापौर महाडेश्वर वादात
By admin | Published: March 7, 2017 04:32 AM2017-03-07T04:32:34+5:302017-03-07T04:32:34+5:30
महापौर होण्यापूर्वीच सेनेचे विश्वंभर महाडिक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
मुंबई : महापौर होण्यापूर्वीच सेनेचे विश्वंभर महाडिक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नियमबाह्य पद्धतीने सदनिका विकत घेतल्याप्रकरणी त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका महापालिकेचा प्रभाग ८७ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे महेंद्र पवार यांनी लघुवाद न्यायालयात निवडणूक याकिचा दाखल केली आहे.
शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार विश्वभंर महाडेश्वर यांनी नियमांचा भंग करून महापालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सोसायटीत सदनिका विकत घेतली आहे. मात्र ही सदनिका त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही, असा आरोप त्यांच्याच प्रभागातून पराभूत झालेले अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी निवडणूक याचिकेद्वारे केला आहे.
महाडेश्वर सांताक्रुझ येथील साईप्रसाद सहकारी गृहनिर्माण संस्था येथे राहतात. मात्र संबंधित सोसायटी ही महापालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी आहे. ते रहात असलेले घर गजानन पंडीत नावाच्या गृहस्थांच्या नावावर आहे. मात्र महाडेश्वर यांनी नियमांचे उल्लंघन करून ते घर पंडीत यांच्याकडून विकत घेतले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या सोसायटीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कोणीही राहू शकत नाही. महाडेश्वर महापालिकेचे कर्मचारी नाहीत. त्यांनी पंडीत यांच्याकडून संबंधित घर विकत घेताना घर हस्तांतरणासाठी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली नाही. त्यांचे वर्तब कायद्याविरुद्ध असल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.(प्रतिनिधी)