भावी खासदारांनी निवडला आजचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:30 AM2019-04-08T06:30:51+5:302019-04-08T06:30:54+5:30
नेते, कार्यकर्त्यांची लगबग सुरू; अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस शिल्लक
मुंबई : आधीच मुहूर्ताचा तुटवडा, त्यात सुट्टीमुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा गुढीपाडव्यासारखा महत्त्वाचा मुहूर्त हुकला. त्यामुळे मुंबईतील बहुतांश उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी सोमवारचा दिवस नक्की केला आहे. वाजतगाजत आणि जोरदार शक्तिप्रदर्शन अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे.
राज्यातील १७ जागांसह मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या जागांसाठी २ एप्रिल रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, भाजपचे गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन वगळता, अन्य कोणत्याच उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलेला नाही. अपक्षांच्या अर्जांचा आकडाही अगदीच नगण्य होता. अर्ज भरण्यासाठी आता सोमवार आणि मंगळवार असे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. शेवटच्या दिवशी आयत्यावेळचा गोंधळ टाळण्यासाठी युती आणि आघाडीच्या उर्वरित उमेदवारांनी सोमवारी अर्ज भरण्याची तयारी केली आहे.
कार्यकर्त्यांना पोहोचले नेत्यांचे ‘निरोप’
दक्षिण मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्यचे उमेदवार राहुल शेवाळे आज मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करतील. सावंत फोर्ट येथील फायर ब्रिगेडपासून मिरवणुकीने अर्ज सादर करण्यासाठी निघणार आहेत, तर राहुल शेवाळे सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करून अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत. दक्षिण मध्यमधील कार्यकर्त्यांना सकाळी जीपीओजवळ जमण्याचे निरोप देण्यात आले आहेत. त्या ठिकाणापासून शेवाळे पदयात्रेने जिल्हाधिकारी कार्यालयात जातील.
च्उत्तर पूर्वेचे भाजप उमेदवार मनोज कोटक शक्तिप्रदर्शन करत, आज मुलुंड येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करतील, तर उत्तर पश्चिमेत शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर मंगळवारी अर्ज भरतील.
विरोधकही शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत
उत्तर पूर्वचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील वगळता, काँग्रेसचे पाचही उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करतील. दिना पाटील यांनी मंगळवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मिलिंद देवरा आणि एकनाथ गायकवाड मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात आज अर्ज भरणार आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरले जाणार आहेत. उर्मिला मातोंडकर, संजय निरुपम आणि प्रिया दत्तसुद्धा शक्तिप्रदर्शनाद्वारे वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत.