मुंबईसह राज्याचे भवितव्य ठरणार
By admin | Published: February 12, 2017 01:26 AM2017-02-12T01:26:03+5:302017-02-12T01:26:03+5:30
मुंबईतील निवडणूक ज्वर आता शिगेला पोहोचू लागला आहे. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपाभोवतीच केंद्रित झालेली आहे. पुढचे आठ दिवस प्रचाराचा हाच माहौल कायम राहणार आहे.
- राहुल रनाळकर, मुंबई
मुंबईतील निवडणूक ज्वर आता शिगेला पोहोचू लागला आहे. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपाभोवतीच केंद्रित झालेली आहे. पुढचे आठ दिवस प्रचाराचा हाच माहौल कायम राहणार आहे. मुंबई आमचीच, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या प्रचाराची राळ उठवली आहे. दोन्ही पक्षांचे हेच दोन प्रमुख कॅम्पेनर आहेत. एकमेकांना अंगावर घेत त्यांनी टीकेचे टोक गाठले आहे. खरं म्हणजे यापूर्वी याचा
ट्रेलर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीवेळी सर्वांनी अनुभवलेला आहे. निवडणुकीनंतर दोघे मांडीला मांडी लावून पुन्हा सत्तेत बसले. मुंबईतही त्याचीच पुनरावृत्ती होईल, असे राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.
प्रचारात प्रचंड घमासान उडवून जनमत आपल्याकडे खेचून घेण्याचे कसब या दोन्ही नेत्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. २३ फेब्रुवारीला काय निकाल लागणार, यावर मुंबई आणि पर्यायाने राज्यातील राजकारणाची समीकरणे अवलंबून आहेत. मुंबईतील क्रमांक एक पक्ष होण्याचा आत्मविश्वास शिवसेनेला आहे. ठाकरे यांच्या देहबोलीतून तो स्पष्टपणे दिसतो, जाणवतो. उद्धव यांच्या मोदी यांना अंगावर घेण्याच्या पवित्र्यानंतर ही स्थिती कल्याण-डोंबिवलीसारखी नक्कीच नाही, असे चित्र मात्र निर्माण झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनादेखील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे मुंबईतही एकहाती यश मिळवून देऊ, असा विश्वास वाटतो.
मुंबईची सामाजिक, राजकीय स्थिती गुंतागुंतीची आहे. बहुतेक प्रभागांमध्ये वस्त्याही संमिश्र आहेत. अनेक प्रभागांमध्ये झोपडपट्ट्यांपासून ते गगनचुंबी टॉवर्स आहेत. उमेदवारांचा स्थानिक प्रभाग सध्याच्या राजकीय परिस्थितीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जातीय आणि धार्मिक मतांची विभागणी मोलाची भूमिका बजावणार आहे. पूर्व उपनगरांमध्ये तमिळ, मुस्लीम, गुजराती पॉकेट्स आहेत. तर पश्चिम उपनगरांमध्येही गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लीम, दक्षिण भारतीय, ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य असलेले प्रभाग आहेत. राजकीय पक्षांचा या
सगळ्या समीकरणांचा गृहपाठ दोन वर्षांपासून बारकाईने सुरू होता. त्यामुळे जे उमेदवार देण्यात आले, त्यावरही या समीकरणांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.
मुंबईत क्रमांक एकचा पक्ष कोणता असेल, ही सर्वांत महत्त्वाची बाब ठरेल. भाजपाला जर शिवसेनेपेक्षा एक जागा जरी जास्त मिळाली, तरी राजकारणाचा रंग बदलेल. त्यामुळे भाजपाला किती जागा मिळवायच्या आहेत, असा प्रश्न आला तर सेनेपेक्षा किमान एक जागा जास्त हे त्याचे उत्तर असते. निवडणुकीनंतर तडजोडीची वेळ आली तर महापौरपदाची मागणी ही भाजपाची प्रबळ राहील. सेनेला काहीही करून धक्का द्यायचाच, हा निश्चय मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मात्र सेनेच्या हातून मुंबई खेचून घेणे, वाटते तेवढी सोपी बाब खचितच नाही.
उद्धव ठाकरे यांची दिवसेंदिवस धारदार होत जाणारी भाषा याचेच प्रतीक आहे. भाषणांमध्ये मुद्द्यांची चपखल मांडणी आणि बोचरी टीका ही त्यांच्या भाषणाची वैशिष्ट्ये आहेत. भाषणात धार असली तरी शांत डोक्याने आणि तुलनेने खालच्या पट्टीत संवाद साधण्यात ते वाकबकार आहेत. मुख्यमंत्र्यांचे भाषणही आक्रमक आणि उपस्थितांच्या मनाचा ठाव घेणारे ठरते. २२७ प्रभागांच्या या मिनी विधानसभेचा निकालही या दोन नेत्यांभोवती राहील. अन्य राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, ‘सपा’ला जागा टिकवण्याचे आव्हान आहे. मनसेची तर अस्तित्वाची लढाई आहे. आधी म्हटल्याप्रमाणे राजकीय आखाड्यातील शह-काटशहाची ही लढाई आहे.