गंडा घालत हॉटेल कामगार बनला कोट्यधीश

By admin | Published: November 24, 2015 01:20 AM2015-11-24T01:20:57+5:302015-11-24T01:20:57+5:30

त्याच्या घरची स्थिती हलाखीची...शिक्षण ९ वी पर्यंतच...हॉटेलमध्ये भांडी घासण्याचं काम...हुशारीच्या जोरावर तो झाला कोट्यधीश, परंतु अनेकांना गंडा घालून.

Gada Ghalat became a hotel worker | गंडा घालत हॉटेल कामगार बनला कोट्यधीश

गंडा घालत हॉटेल कामगार बनला कोट्यधीश

Next

पुणे : त्याच्या घरची स्थिती हलाखीची...शिक्षण ९ वी पर्यंतच...हॉटेलमध्ये भांडी घासण्याचं काम...हुशारीच्या जोरावर तो झाला कोट्यधीश, परंतु अनेकांना गंडा घालून...ही कथा आहे पोलिसांनी जेरबंद केलेल्या तोतया केंद्रीय अधिकाऱ्याची.
विशाल पांडुरंग ओंबाळे (वय ३८, रा. येरवडा) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. त्याच्यावर आतापर्यंत तब्बल सहा गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीसमित्राने पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना दिलेल्या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली होती.
सुरुवातीला भाड्याने घेतलेल्या आलिशान मोटारींवर लाल दिवा लावून त्याने व्यावसायिकांसह बॉलिवूडच्या कलाकारांनाही गंडा घातला. कोणाला संशय येऊ नये तसेच आपला प्रभाव राहावा याकरिता हा बहाद्दर पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करायचा. वसई, विरार व ठाण्यातील लोकांना त्याने आतापर्यंत १ कोटी १७ लाखांचा गंडा घातला आहे.
ओंबाळेची कथा एखाद्या सिने कथानकाला शोभेल अशीच आहे. त्याचे शिक्षण केवळ ९ वी होते. वाघोली, कोथरूड आदी भागांतील हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम करता करता तो एका हॉटेलचा व्यवस्थापक झाला. मुक्त विद्यापीठातून तो पदवीच्या द्वितीय वर्षापर्यंत पोचला. त्याच्या एका मित्राला कोणीतरी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने गंडवल्याचे प्रकरण त्याला समजले. तेथेच त्याच्या डोक्यात कल्पना चमकून गेली आणि त्याने लोकांना गंडवण्याचा धंदा सुरू केला.
केंद्र शासनाच्या योजनांमधून पैसे मिळवून देण्याचे आमिष तो अनेकांना दाखवू लागला. काही जणांना तर महामंडळाचा अध्यक्ष बनवण्याच्या आमिषाने त्याने लुबाडले. महागड्या मोटारींची खरेदी करून त्यावर लाल दिवा, केंद्र शासनाचे बनावट ओळखपत्र, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, सफारीमधले बॉडीगार्ड असा लवाजमा त्याने तयार केला. व्यावसायिकांना कधी कर्ज देण्याच्या बहाण्याने, तर कधी धमकावत त्याने कोट्यावधींची माया गोळा केली.
ओंबाळेला गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश निकम, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस हवालदार शैलेश जगताप, कर्मचारी रूपेश वाघमारे, फिरोज बागवान, केरनाथ कांबळे आणि परवेझ जमादार यांनी कोरेगाव पार्क भागातून अटक केली होती.

Web Title: Gada Ghalat became a hotel worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.