गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोट; पोलीस उपअधीक्षक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 02:19 AM2019-06-22T02:19:33+5:302019-06-22T06:45:14+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात महाराष्ट्र दिनी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १५ जवान हुतात्मा झाले.
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात महाराष्ट्र दिनी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १५ जवान हुतात्मा झाले. याप्रकरणी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करत असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
कुरखेडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरुंग स्फोटात १५ पोलीस हुतात्मा झाले. नियमबाह्यपणे जवानांना उघड्या जीपमध्ये घटनास्थळी रवाना करण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री केसरकर म्हणाले की, कुरखेडा येथील नक्षली हल्लाचा सखोल चौकशी अहवाल प्राप्त झाला असून दोन दिवसांत यावर निर्णय घेत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. कुरखेडा येथे जवानांचे पथक नेत असताना प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) अवलंबण्यात आली नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. एसओपीचे पालन न करणाºयांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही केसरकर यांनी दिले.
मात्र त्यांच्या उत्तरावर समाधान न झालेल्या विरोधकांनी अहवालावर ताबडतोब कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी लावून धरली. अखेरीस केसरकरांनी गडचिरोलीच्या तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांना निलंबित करत असल्याची घोषणा केली. तसेच या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या वारसदाराला अर्ज केल्यानंतर सात दिवसांच्या आत नोकरी दिली जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले.
शहरी भागातून नक्षल भरती
ग्रामीण भागातून नक्षली पथकांत होणारी भरती पूर्णपणे थांबली आहे. तरी शहरी भागातून भरती सुरू असून गृह विभागाचे त्यावर बारीक लक्ष असल्याचा इशाराही केसरकर यांनी सविस्तर उत्तर देताना दिला. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी राज्य सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. दीर्घकाळ हवेत राहणाºया ड्रोनचा वापर नक्षलींच्या बिमोडासाठी करण्यात येत आहे. संरक्षण संशोधन विकास संस्थेने तयार केलेल्या रोबोट तंत्रज्ञानाचा वापरही यासाठी केला जाणार असल्याचे केसरकरांनी सांगितले.