गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमक; १ जवान शहीद तर दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 09:57 AM2017-11-27T09:57:34+5:302017-11-27T11:33:28+5:30
गडचिरोलीतील ग्यारपत्ती भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे.
गडचिरोली- गडचिरोलीतील ग्यारपत्ती भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास कोरची तालुक्यातील कोटगूल येथे घडविलेल्या बॉम्बस्फोटात एक पोलीस जवान शहीद तर दोन गंभीर जखमी झाले होते. सततच्या या नक्षली हिंसाचारामुळे नक्षलविरोधी मोहिमेला जबर हादरा बसला आहे.
रविवारी सायंकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर हल्ला चढविला. यात एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ग्यारपत्ती पोलीस मदत केंद्रांतर्गत टवे येथील जंगलात घडली. मंजुनाथ असे शहीद जवानाचे नाव असून, तो कर्नाटक राज्यातील रहिवासी आहे. या घटनेत लोकेशकुमार व दीपक शर्मा (दोघेही उत्तरप्रदेश) हे जवान गंभीर जखमी झाले आहेत.
२४ नोव्हेंबरला नक्षल्यांनी कोटगूल येथे केलेल्या भूसुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे हे शहीद झाले, तर सोनल खेवले व विकास धात्रक हे जवान जखमी झाले. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी नक्षलविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डी.कनकरत्नम व पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्या भागात नक्षली कारवाया वाढल्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक नक्षलशोध अभियानावर पाठविण्यात आली. रविवारी संध्याकाळी ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रातील केंद्रीय राखीव दलाच्या जवानांची एक तुकडी टवे येथील जंगलात गेली होती. ही तुकडी त्या भागात मुक्कामी होती. एवढयात सशस्त्र नक्षल्यांनी या तुकडीवर हल्ला चढविला. सुरूवातीला नक्षलवादी पोलिसांचा दबाव पाहून पळून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र नक्षलवादीच पोलिसांवर वरचढ झाले आणि या तुंबळ चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अभियानावर गेलेली ही तुकडी अद्यापही आपल्या आश्रयस्थळी परत आली नसली तरी त्यांच्या संपर्कात असल्याचे नक्षलविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. गेल्या आठवडाभरात नक्षल्यांनी धानोरा तालुक्यात ३ नागरिकांची हत्या केली, तर २ जवानांना शहीद व्हावे लागले. या घटनेमुळे पोलीस दलाला मोठा हादरा बसला आहे. हे जवान सीआरपीएफच्या 113 बटालियनचे आहेत.
संबंधित बातमी : नक्षलवाद्यांच्या बंदुकीने ४९०हून अधिक आदिवासींचा घेतला बळी