गडचिरोलीत शेतकरी साहित्य संमेलन
By Admin | Published: January 9, 2017 04:21 AM2017-01-09T04:21:39+5:302017-01-09T04:21:39+5:30
तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी २०१७ रोजी गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात
गडचिरोली : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी २०१७ रोजी गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. शेषराव मोहिते असतील, तर उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते होणार आहे.
या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते शालिक पाटील नाकाडे तसेच संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे उपस्थित राहणार आहे. गेल्या १५-२० वर्षांत देशात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले आढळत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. (प्रतिनिधी)