गडचिरोलीला पुराचा फटका

By admin | Published: July 22, 2014 12:50 AM2014-07-22T00:50:24+5:302014-07-22T00:50:24+5:30

विदर्भात सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन २४ तासात सरासरी ६५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Gadchiroli flood hit | गडचिरोलीला पुराचा फटका

गडचिरोलीला पुराचा फटका

Next

सर्वात कमी पाऊस बुलडाण्यात : अकोला-वाशिम कोरडे
नागपूर : विदर्भात सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन २४ तासात सरासरी ६५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. कठाणी, खोब्रागडी, पाल, वैनगंगा, पामुलगौतम नद्या फुगल्या आहेत. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ४३८६.९ मिमी पाऊस झाला असून त्याची सरासरी ३६५.५० एवढी आहे.
भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड येथील राजे विश्वेश्वरराव चौकापर्यंत पोहोचले आहे. यामुळे या चौकातील दुकानदारांनी आपल्या दुकानातील सामान इतरत्र हलविले असल्याची माहिती आहे. गडचिरोलीनजीकची कठाणी नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीचे पाणी पुलाला भिडले आहे. सोमवारी दिवसभर संततधार कायम राहिल्यास गडचिरोली-आरमोरी-नागपूर मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. भामरागड, कोरची तालुक्यात अतिवृष्टीमुळे लहान नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अंतर्गत मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे.
अमरावती शहरासह जिल्ह्यात रिमझीम पावसाच्या सरी कोसळत आहे. दिवसभरात जिल्ह्यातील १४ तालुक्यात पावसाने कमी जास्त प्रमाणात हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सरासरी ७.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. २० जुलैपर्यंत करण्यात आलेल्या पेरणीला हा पाऊस पोषक ठरणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी ३०.३६ मिमी आणि जून ते २१ जुलैपर्यंत १९३ मि.मि. पावसाची नोंद झाली. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली असून या पावसामुळे पिकांना फायदा होणार आहे. चिमूर, ब्रह्मपुरी, कोरपना तालुक्यात नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. कोरपना तालुक्यातील एका गावातील रपट्यावरून पाणी वाहत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २४ तासात केवळ ४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट कायम आहे.
गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस व वाऱ्यामुळे काही भागात झाडे तुटून वीज तारांवर पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या. मात्र कुठेही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. भंडारा जिल्ह्यात दमदार पावसामुळे दुबार पेरणीनंतर आलेल्या पऱ्ह्यांची रोवणी करण्यासाठी शेतकरी सरसावला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
शनिवारी दुपारपासूनच पावसाला सुरूवात झाली. पावसाची ही झळ रविवारीही दिवसभर कायम होती. जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी ५३ मि.मी. पाऊस बरसला.
वर्धा जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यात सोमवारी सकाळी सरासरी ८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक २१.२ मिमी. पाऊस हिंगणघाट तालुक्यात झाला. बुलडाणा जिल्ह्यात २.३ मिमी पावसाची नोंद झाली.

Web Title: Gadchiroli flood hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.