जानेवारीमध्ये कार्यान्वित होणार गडचिरोली कारागृह
By admin | Published: December 12, 2014 12:27 AM2014-12-12T00:27:53+5:302014-12-12T00:27:53+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण केल्यास गडचिरोली जिल्हा कारागृह १ जानेवारीपासून कार्यान्वित करण्याची तयारी कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी दर्शविली आहे.
हायकोर्टात माहिती : दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक
नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण केल्यास गडचिरोली जिल्हा कारागृह १ जानेवारीपासून कार्यान्वित करण्याची तयारी कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी दर्शविली आहे. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कैद्यांविरुद्ध कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, अहेरी इत्यादी जेएमएफसी न्यायालयांत खटले सुरू आहेत़ परंतु, सुरक्षेच्या कारणावरून सुनावणीच्या तारखेवर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत नाही. याविरुद्ध मानवाधिकार संरक्षण समितीच्या सदस्य डॉ़ शोमा सेन यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. गडचिरोलीत कारागृह झाल्यास नक्षली कैद्यांना न्यायालयात उपस्थित करणे कठीण जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शासनाने गडचिरोलीत कारागृह बांधले असले तरी आवश्यक सुविधा नसल्यामुळे कारागृह प्रशासनाने इमारतीचा ताबा घेतलेला नाही. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभाग व कारागृह प्रशासन अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठका घेऊन वाद निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. यानंतर गडचिरोली कारागृह जानेवारीत सुरू होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड़ कैलाश नरवाडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)