कोकणासह गडचिरोलीत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:07 AM2017-07-19T01:07:58+5:302017-07-19T01:07:58+5:30

राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोव्यासह विदर्भातील गडचिरोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. कोकणातील नद्यांना पूर आल्याने

Gadchiroli overcrowded with Konkan | कोकणासह गडचिरोलीत अतिवृष्टी

कोकणासह गडचिरोलीत अतिवृष्टी

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/पुणे : राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोव्यासह विदर्भातील गडचिरोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. कोकणातील नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यातही पाऊस सक्रिय झाला असून परभणीत जोरदार सरी बरसल्या. जालना, बीड, हिंगोली, लातूरसह औरंगाबाद शहरातही रिमझिम पाऊस झाला.
पावसाने पश्चिम महाराष्ट्राही सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस होता. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यांना पावसाने झोडपून काढले असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यंदा पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. राधानगरी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून, वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १२०० घनफूट पाणी सोडले जात असल्याने नद्यांची पातळी वाढली आहे. पंचगंगा, भोगावती व कासारी नद्यांवरील अकरा बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सांगली जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. पलूस, कडेगाव तासगाव तालुक्यातील पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून गेल्या २४ तासात पाणीसाठा एक टीएमसीने वाढला आहे. सातारा जिल्ह्यातही सर्वदूर दमदार पाऊस पडत आहे. कोयना धरण पाणलोेट क्षेत्रात चार दिवसांपासून संततधार कायम आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने पाणीसाठ्यात चोवीस तासांत चार टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे धरणात सध्या ५२.३६ पाणीसाठा झाला आहे.
कोकणात धुमशान
कोकणात अक्षरक्ष: पावसाचे धुमशान सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. नारिंगी आणि जगबुडी नदीला पूर आला असून दुपारी खेड आणि संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात मध्यरात्री जोरदार वादळ झाले. रत्नागिरी परिसरालाही पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात सोमवारी रात्रीपासून जोरदार बरसणाऱ्या पावसाने आंबेरी, दुकानवाड, पुळास येथील पुलावर पाणी आले असून, खोऱ्यातील तब्बल २७ गावांचा पूर्णत: संपर्क तुटला आहे. या परिसरातील शाळाही लवकर सोडून देण्यात आल्या. रात्री एस.टी. वाहतूक पूर्णत: ठप्प झाली असून, अनेक प्रवाशी दुकानवाड, शिवापूर तसेच अन्य गावात अडकून पडले आहेत. उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेमध्ये पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने एकच तारांबळ उडाली आहे.
रायगड जिल्ह्यातही संततधार पाऊस झाला. अंबा, सावित्री, कुंडलिका नद्यांची जलपातळी सोमवारी सायंकाळी पूर रेषेजवळ पोहोचल्याने नदी किनाऱ्याच्या सुमारे २४५ गावांतील ग्रामस्थांनी रात्र जागूनच काढली. मात्र पहाटेच्या सुमारास पाणी ओसरू लागल्याने पुराचा धोका टळला आहे. कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू होती.
नागपूरात हजेरी, गडचिरोलीत अतिवृष्टी
विदर्भातही पाऊस सक्रिय असून नागपूर शहरात तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर धो-धो पाऊस बरसला. गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली़

धरणांमधील साठा वाढला
धरण क्षेत्रात संततधार सुरु असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणामधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे़ भिमा खोऱ्यातील २५ पैकी ६ धरणांमधील पाणीसाठा ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे़ मावळमधील पडत असलेल्या पावसाने आंध्रा धरण एकाच दिवसात ९९़५५ टक्के भरले आहे़ चासकमान धरण ८०़५१ टक्के भरले असून धरणातून नदीपात्रात ३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे़ येडगाव ८१़४८ टक्के, कळमोडी १०० टक्के, कासारसाई ८७़६७ टक्के धरले आहे़

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतरअतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाल्याने महाराष्ट्रात आणखी ३ दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे़

Web Title: Gadchiroli overcrowded with Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.