गडचिरोली : नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेल्या अबूझमाड जंगलात पोलिसांनी नक्षल कॅम्प केला उद्धवस्त; शस्त्र, घोडे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 10:02 PM2017-08-13T22:02:55+5:302017-08-13T22:54:43+5:30
नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजला जाणा-या गडचिरोली व नारायणपूर (छत्तीसगड) जिल्ह्याच्या सीमेवर अबूझमाड जंगलातील नक्षलवाद्यांचा कॅम्प गडचिरोली पोलिसांनी अभियान राबवून शनिवारी दुपारच्या सुमारास उद्ध्वस्त केला.
गडचिरोली, दि. 13 - नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजला जाणा-या गडचिरोली व नारायणपूर (छत्तीसगड) जिल्ह्याच्या सीमेवर अबूझमाड जंगलातील नक्षलवाद्यांचा कॅम्प गडचिरोली पोलिसांनी अभियान राबवून शनिवारी दुपारच्या सुमारास उद्ध्वस्त केला. गडचिरोली व नारायणपूर (छत्तिसगड) जिल्ह्यांच्या सीमेवर अबुझमाड भागात नक्षलवाद्यांचा कॅम्प असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस दलाला मिळाली होती. पोलिसांनी येथून तीन भरमार रायफली, सहा घोडे व दैनंदिन वापराचे व नक्षल साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले. विशेष म्हणजे, प्रथमच चकमकीदरम्यान नक्षल्यांचे घोडे जप्त करण्यात आले आहे.
छत्तीसगड जिल्ह्याच्या सीमेवर अबूझमाड भागात नक्षल कॅम्प असल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात गडचिरोलीचे विशेष अभियान पथक अबूझमाड भागातील तुंडेवारा व पोकनार गावाजवळील जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित होते. दरम्यान शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ नक्षल्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या चकमकीत पोलीस नक्षलवाद्यांवर वरचढ होत असल्याचे पाहून आपले साहित्य तिथेच टाकून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेत सदर नक्षल कॅम्प उद्ध्वस्त केल्यामुळे नक्षल चळवळीस मोठा हादरा बसला आहे.
वरिष्ठ नक्षलवादी नेते हे ब-याचदा अबूझमाड जंगल परिसरात घोड्यांचा वापर करीत होते. हे स्पष्ट होत आहे. सदर भागात भूपतीसारख्या वरिष्ठ नक्षलवाद्याचा वावर असल्याची शक्यता पोलीस विभागाने वर्तविली आहे. गेल्या महिनाभरात पोलीस जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नक्षलवादी हल्ल्याचा बिमोड करीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.