गृहमंत्र्यांचा दौरा सुरु असतानाच १२ नक्षलवाद्यांचा खात्मा; फडणवीसांकडून जवानांना ५१ लाखांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 08:46 AM2024-07-18T08:46:24+5:302024-07-18T08:47:21+5:30
गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड सीमेलगतच्या जंगल परिसरात १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले
Gadchiroli Police : महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोलीपोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ नक्षलवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर असतानाच घनदाट जंगलात ही चकमक झाली. अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे स्टील निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व उद्योगमंत्री उदय सामंत आले होते. दुपारच्या सुमारास झालेल्या या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.
बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (ऑपरेशन्स) यांच्या नेतृत्वाखाली ७ सी ६० पथकांनी विशेष ऑपरेशन सुरू केले. वांडोली गावाजवळ १२-१५ नक्षलवादी तळ ठोकून असल्याचे त्यांना माहिती मिळाली होती. इंटला गावाजवळ जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या कारवाई दरम्यान गोळीबार सुमारे ६ तासांहून अधिक काळ सुरू होता. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले. रात्री ८ वाजता चकमक थांबली. यावेळी तीन एके ४७,२ INSAS, १ कार्बाइन आणि १ एसेलआर अशी ७ शस्त्रे जप्त करण्यात आली.
जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस
त्यानंतर या कारवाईची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गडचिरोली पोलिसांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र), पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सर्व सहभागी जवानांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांनाही शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार- मुख्यमंत्री
"ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरणारी असून विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणे, असे आमचे धोरण आहे. तसेच गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे. पोलिस दलाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.