गडचिरोलीची धावपट्टी पाच वर्षांपासून रखडली
By admin | Published: September 14, 2014 01:05 AM2014-09-14T01:05:01+5:302014-09-14T01:05:01+5:30
छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या
सरकारचे दुर्लक्ष : जागेचा शोध घेऊनही कामाला सुरूवात नाही
गडचिरोली : छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या मागास जिल्ह्यातील हवाईपट्टीचे काम मागील पाच वर्षांपासून रखडलेले आहे.
२००९ हे वर्ष पोलीस दलासाठी आजवरच्या इतिहासातील सर्वात काळे वर्ष ठरले. पोलीस-नक्षल चकमकीत ५१ पोलीस जवान शहीद झालेत. पोलीस जवानांना मानवंदना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावर्षी गडचिरोलीत आले होते. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे हवाईपट्टी बांधण्याचा निर्णय जाहीर केला. लगेच जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन जागेचा शोधही सुरू झाला. बोदली, मेंढा, माडेतुकूम गावालगत जागा घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र स्थानिक शेतकरी व काही कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यानंतर चामोर्शी मार्गावर गडचिरोली ते वाकडी दरम्यान जागा निश्चित करण्यात आली. राज्य शासनाची एक चमूही या ठिकाणी जागेचे मोजमाप करण्यासाठी आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी शासनाच्या या चमूला जिल्हाधिकारी कार्यालयात जागेबाबतही विस्तृत माहितीही दिली होती.
पोलीस प्रशासनाला हेलिकॉप्टरही उपलब्ध करून देण्यात आले. मात्र मागील पाच वर्षात हवाईपट्टीच्या कामाची किंचितही प्रगती होऊ शकली नाही.
नक्षल घटनेनंतर जखमी पोलीस जवानांना उपचारासाठी तत्काळ नागपुरात नेता यावे यासाठी या हवाईपट्टीचे निर्माण होणार होते. याशिवाय या छोट्या विमानतळाचा गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासालाही फायदाच होणार होता. मात्र हवाईपट्टी रखडल्याने सारे स्वप्नवत् ठरले आहे. आता परत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव पी.एस. मिना यांनी गडचिरोलीचे विमानतळ होईल, असे सुतोवाच केले आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून हा प्रस्ताव कागदावरच आहे.
महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण व गडचिरोली जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये विमानतळासाठी जागा अधिग्रहीत करण्यावरून वादंग निर्माण झाल्याने हवाईपट्टीचा हा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)