जीपीएसच्या मदतीने गाडीचोराला अटक
By admin | Published: July 5, 2017 05:24 AM2017-07-05T05:24:35+5:302017-07-05T05:24:35+5:30
वाहनचालक म्हणून काम करायचे, नंतर तीच गाडी घेऊन लंपास व्हायचे आणि ती विकून टाकायची, अशी कार्यपद्धती असलेल्या एका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहनचालक म्हणून काम करायचे, नंतर तीच गाडी घेऊन लंपास व्हायचे आणि ती विकून टाकायची, अशी कार्यपद्धती असलेल्या एका चोराच्या मुसक्या सोमवारी कांदिवली पोलिसांनी आवळल्या.
सुनील जगमाल जापुदा उर्फ बिष्णोई (२०) असे अटक करण्यात आलेल्या या चोराचे नाव आहे.
कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलने कांदिवली पोलिसांच्या हद्दीतून एक टाटा सुमो गाडी लंपास केली होती. रिलायन्स कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्याने सुनीलला स्वत:कडे चालक म्हणून कामाला ठेवले होते. सुनीलने काही महिने ही गाडी चालविण्याचे काम केले. मात्र, नंतर त्याची नियत बदलली आणि कांदिवली पश्चिमच्या लिंक रोडवर असलेली गाडी सुनील घेऊन फरार झाला. ही बाब मालकाच्या लक्षात आली, तेव्हा त्याने जाऊन कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गाडीतील जीपीएस सीस्टिमच्या मदतीने कांदिवली पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले, जे गुजरात दाखवित होते. त्यानुसार, कारवाई करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
साथीदारांचा शोध सुरू
सुनील हा मूळचा राजस्थानच्या जल्लोर जिल्ह्यातील फडीपू राणीवाडा गावचा राहणारा आहे. त्याने यापूर्वीदेखील अशा प्रकारे गाड्यांची चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, या कामात तो एकटा नसून, अजून काही लोकांचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार, या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.