चंद्रभागा अस्वच्छ करताना गाडगेबाबा आठवा
By Admin | Published: March 5, 2015 01:48 AM2015-03-05T01:48:02+5:302015-03-05T01:48:02+5:30
तुम्ही संतांचे दाखले देत असाल तर आम्हीही संत गाडगेबाबा व संत ज्ञानेश्वर यांची उदाहरणे देऊ शकतो, असे खडेबोल उच्च न्यायालयाने बुधवारी पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना सुनावले.
मुंबई : तुम्ही संतांचे दाखले देत असाल तर आम्हीही संत गाडगेबाबा व संत ज्ञानेश्वर यांची उदाहरणे देऊ शकतो, असे खडेबोल उच्च न्यायालयाने बुधवारी पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना सुनावले.
नदीपात्रात धार्मिक विधी व बांधकामास मनाई करणाऱ्या आदेशाचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारा अर्ज वारकऱ्यांनी न्यायालयात केला आहे. त्यावर कुठल्या कायद्याखाली तुम्ही येथे धार्मिक विधी करण्यास परवानगी मागत आहात, असा सवाल न्यायालयाने गेल्या महिन्यात केला. येथे धार्मिक विधी करणे हा आमचा मूलभूत अधिकार असल्याचा दावा वारकऱ्यांनी केला. त्यावर न्यायालयाने वारकऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले व ही बंदी उठवण्यास नकार दिला.
चंद्रभागेचा काठ ही सरकारी मालमत्ता आहे. त्यामुळे तेथे घाण होणे गैर आहे. एकीकडे गंगा नदी स्वच्छ करण्याचा उपक्रम केंद्र सरकार राबवत असताना चंद्रभागा नदी अधिकच घाण होत आहे व याला निर्बंध घातल्यास वारकरी न्यायालयाचे दार ठोठावतात हे व्यवहार्य नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
मुळात आपण चंद्रावर जाण्याची भाषा करीत असताना पंढरपुरात मानवी विष्ठा मानवाकडून उचलली जाणे, हे दुर्दैवी आहे. या प्रकरणावर गेली २ वर्षे सुनावणी सुरू आहे आणि मानवी विष्ठा मानवाकडून उचलण्यास बंदी आणल्यानंतर व नदीपात्रात निर्बंध आल्यावरच वारकऱ्यांनी न्यायालयात धाव घ्यावी हे योग्य नाही, असेही न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने ओढले.
धार्मिक विधीस मनाई
याप्रकरणी एका सामाजिक संघटनेने अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. येथे मानवी विष्ठा मानवाकडूनच उचलली जाते यास मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने येथील नदीपात्रात बांधकाम करण्यास व धार्मिक विधी करण्यास मनाई केली.
विठ्ठलाच्या महापूजेसाठी दरवर्षी मुख्यमंत्री येतात. मात्र येथील स्वच्छेतचा मुद्दा कोणालाही महत्त्वाचा वाटत नाही, अशा शब्दांत शासनाला फटकारले.