‘त्या’ अपंग चिमुकलीच्या मदतीला धावून आले गडकरी!
By admin | Published: January 22, 2015 12:45 AM2015-01-22T00:45:44+5:302015-01-22T00:45:44+5:30
‘लोकमत’ने फोडली होती वाचा : नाशिकच्या अनाथश्रमात होणार सांभाळ.
अनिल गवई / खामगाव (जि. बुलडाणा):
आईने लाथाडले, अनाथालयांनी झिडकारल्याचे समजताच अपंग चिमुकलीच्या मदतीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धावून आले. त्यांनी चिमुकलीची वणवण थांबवून तिला अनाथाश्रमात सांभाळण्याचे पत्र पुणे येथील महिला व बाल विकास आयुक्तालयाला पाठविले. दरम्यान, सदर चिमुकलीस सांभाळण्याची जबाबदारी नाशिक जिल्ह्यातील अनाथालयाने स्वीकारली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून लोकमतने या अपंग चिमुकलीची वणवण १८ जानेवारीला प्रकाशित केली होती, हे येथे उल्लेखनीय आहे.
शुक्रवार, ९ जानेवारी रोजी शेगाव येथे एका निर्दयी मातेने अपंग असलेल्या या चिमुरडीस सोडून दिले होते. शेगाव पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तेथील सामान्य रुग्णालयात तिच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर तिला बुलडाणा जिल्हा बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले. समितीने सुरुवातीला नागपूर येथील अनाथालयात सोपविण्यासाठी शेगाव पोलिसांना पत्र दिले, मात्र बुलडाणा शहरातच दोन अनाथालये असल्याची तसेच ती अपंग असल्याची सबब पुढे करून नागपूर येथील अनाथालयांच्या संचालकांनी तिच्या संगोपनास नकार दिला. त्यामुळे निराश होऊन परतलेल्या शेगाव पोलिसांनी तिला पुन्हा बाल कल्याण समितीकडे आणले. समितीने बुलडाणा येथील दोन्ही अनाथालयांना पत्र दिले, मात्र पुन्हा चिमुकलीचे अपंगत्व आडवे आले. अनाथालयांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान, नाही नाही करीत बाल कल्याण समितीने शुक्रवार, १६ जानेवारी रोजी तिचे तात्पुरते पालकत्व स्वीकारले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष मंगला सपकाळ यांनी चिमुकलीला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगीतले. नाशिक येथील अनाथलयाशी दूरध्वनीहून बोलणे झाले आहे. या संदर्भात लवकरच निर्णय घेऊन शेगाव पोलिसांना पत्र दिले जाईल. त्यानंतर या चिमुकलीच्या सुपूर्दतेचा मार्ग मोकळा होईल, असे त्या म्हणाल्या.
*नाशिक येथील अनाथालयाने दर्शविली संगोपनाची तयारी
त्या चिमुकलीचे संगोपन करण्यास नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळे येथील श्रीमती गारडा अनाथ बालकाश्रमाने तयारी दर्शविली आहे. या मुलीला आश्रमात आणावे, अशी विनंतीही त्यांनी शेगाव पोलिसांकडे केली आहे.
*केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची तत्परता!
अपंगत्वामुळे राज्यातील अनाथालये संगोपनास नकार देत असल्याची बाब लोकमतसह एका सामाजिक कार्यकर्त्याने १९ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून, गडकरी यांनी पुणे येथील महिला व बाल विकास आयुक्तालयाला पत्र दिले तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर या मुलीच्या संगोपनाचा प्रश्न निकाली लागल्याची माहिती आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी यांचे पत्र मिळाल्याच्या बाबीला बाल कल्याण समिती अध्यक्ष मंगला सपकाळ यांनी दुजोरा दिला. तथापि, ते आपण वाचले नसल्याचे त्या म्हणाल्या.