लोकसभा '२२० क्लब'च्या चर्चेवर गडकरींचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:12 PM2019-03-20T12:12:19+5:302019-03-20T12:13:14+5:30
मी पंतप्रधान होईल, या केवळ अफवा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत २२० जागा जिंकल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान होतील अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. यावर गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभा निवणुकीत भाजपने २२० जागा जिंकल्यानंतर गडकरींनी पंतप्रधान व्हावे, असं वाटणारा '२२० क्लब' अस्तित्वात नसून या केवळ माध्यमांमध्ये पसरविलेल्या अफवा असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
२०१४ लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवले होते. परंतु २०१९ मध्ये भाजपने अपेक्षेप्रमाणे जागा जिंकल्या नाही तर नितीन गडकरी पंतप्रधान पदासाठी सर्वसामान्य चेहरा असणार का, त्यावर गडकरी म्हणाले, मी पंतप्रधान होईल, या केवळ अफवा आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तुम्ही संघाच्या जवळचे असून मित्र पक्षांसोबत काम करण्यासाठी तुम्ही व्यक्त समजले जाते, असं विचारल्यानंतर गडकरी म्हणाले असं काही नाही. परंतु या विषयी ज्यांना लिहायचे आहे, ते लिहितातच. मी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी इतर समीकरणांवर विश्वास ठेवत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मागील पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे भाजपला पुन्हा बहुमत मिळेल असंही त्यांनी म्हटले.