गडकरी, फडणवीस यांनी घेतली सरसंघचालकांची भेट
By admin | Published: July 3, 2016 10:00 PM2016-07-03T22:00:28+5:302016-07-03T22:00:28+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली.
ऑनलाइन लोकमत
नागपूर,दि. ३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. येत्या काही दिवसांत राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची दाट शक्यता आहे. यासंदर्भातच या भेटीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे गडकरी व फडणवीस या दोघांनीही सरसंघचालकांशी काही वेळेच्या अंतराने वेगवेगळी भेट घेतली.
सायंकाळी ६.३० च्या सुमारास मुख्यमंत्री रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची त्यांनी भेट घेतली व चर्चा केली. सायंकाळी ७.३० नंतर सरसंघचालक महाल येथील संघ मुख्यालयात गेले. तेथे गडकरी यांनी त्यांची भेट घेतली व चर्चा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची दाट शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे महसूल खाते कुणाला द्यायचे याबाबत पक्षाअंतर्गत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. भाजपातील सध्याचे अंतर्गत वातावरण लक्षात घेता मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान विभागीय व सामाजिक समतोल राखण्याचे आव्हान आहे.
या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय पक्षातील अंतर्गत राजकारण, मित्रपक्षांसोबतचे संबंध इत्यादीबाबतदेखील यावेळी चर्चा झाली. सरसंघचालकांनीदेखील काही समाज, संघटनांचे प्रश्न मुख्यमंत्री व गडकरी यांच्या कानावर घातले. मुख्यमंत्री सुमारे अर्धा तास रेशीमबागेत होते. तर गडकरीदेखील तेवढाच वेळ संघ मुख्यालयात होते. या भेटीबाबतीत संघ मुख्यालयातून कुणीही प्रतिक्रिया दिली नाही.