गडकरी समर्थकांना मिळाली संधी
By admin | Published: December 6, 2014 02:08 AM2014-12-06T02:08:01+5:302014-12-06T02:08:01+5:30
मंत्रिमंडळ निवडताना भाजपाने विदर्भाला झुकते माप दिले असून, त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाच वरचष्मा दिसून येतो
यदु जोशी, मुंबई
मंत्रिमंडळ निवडताना भाजपाने विदर्भाला झुकते माप दिले असून, त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाच वरचष्मा दिसून येतो. आज शपथ घेतलेले भाजपाचे विदर्भातील पाच मंत्री आणि या आधीच मंत्रिमंडळात असलेले वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे गडकरींचे खंदे समर्थक म्हणून ओळले जातात. विदर्भातून मंत्री निवडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फारसा वाव मिळाला नसल्याचे दिसते.
नवे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना १९९७ मध्ये जिल्हा परिषदेची भाजपाची उमेदवारी मिळवून देण्यात गडकरी यांचे पक्षांतर्गत विरोधक बनवारीलाल पुरोहित यांची मोलाची भूमिका होती. मात्र निवडून आल्यानंतर बावनकुळे हे गडकरी समर्थक बनले.
कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले राजकुमार बडोले हे जिल्हा परिषदेत शाखा अभियंता होते. व्हीआरएस घेऊन राजकारणात आले. तेही गडकरी यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. अनुसूचित जातीचे असलेले बडोले दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.
अकोल्याचे डॉ. रणजित पाटील यांना राज्यमंत्री पद मिळाले असून, ते पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. पाटील यांनी बी.टी.देशमुख यांचा पराभव केल्यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. गडकरी समर्थक असल्याची बक्षिसी त्यांना मिळाली.
मंत्रिपदाची लॉटरी लागलेले अमरावतीचे प्रवीण पोटे हे बिल्डर आहेत. त्यांचे इंजिनियरिंग कॉलेजही आहे. आधी ते काँग्रेसमध्ये होते. भाजपात येऊन त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत प्रवेश केला. तेदेखील गडकरींचे खास विश्वासू म्हणून ओळखले जातात.
> अहेरीचे राजे अंबरीशराजे आत्राम यांचे आजोबा राजे विश्वेश्वरराव हे खासदार तर वडील सत्यवानराजे हे आमदार होते. अंबरीशराजे हे सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आणि गडकरींच्या माध्यमातून भाजपाशी जोडले गेले आहेत. स्थानिक भाजपाचे पदाधिकारी आणि खासदार अशोक नेते यांच्याशी त्यांचे खटके उडत असतात. असे असूनही पक्षाने त्यांना राज्यमंत्रिपद देऊन स्थानिक प्रस्थापितांना धक्का दिला. फडणवीस यांचे समर्थक असलेले चैनसुख संचेतींना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही.
इच्छुकांच्या पदरी निराशा
विदर्भात इच्छुक असलेल्यांची निराशा करीत भाजपाने नवीन चेहऱ्यांना संधी दिली. भाऊसाहेब फुंडकर, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, प्रकाश भारसाकळे, कृष्णा खोपडे, डॉ. अनिल बोंडे यांच्या पदरी निराशा आली. पश्चिम विदर्भातील दोन्ही राज्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत.
बुलडाणा जिल्हा होल्डवर
बुलडाणा जिल्ह्यातून भाऊसाहेब फुंडकर, चैनसुख संचेती आणि डॉ. संजय कुटे हे तीन जण मंत्रिपदाचे दावेदार होते. त्यापैकी एकाही नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने या जिल्ह्यातून कोणालाही मंत्रिपद मिळाले नाही. मागासलेल्या या जिल्ह्याचा मंत्रिपदाचा बॅकलॉग कायम राहिला. रणजित पाटील यांच्या रुपाने अकोला जिल्ह्याला १० वर्षांनंतर मंत्रीपद मिळाले.
शिवसेनेने केली निराशा
शिवसेनेने विदर्भाला केवळ एक राज्यमंत्रिपद दिले. विदर्भात सर्वाधिक मतांनी विजयी झालेले संजय राठोड यांना राज्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये मुंबईचा वरचश्मा आहे.