गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट
By admin | Published: October 26, 2014 12:20 AM2014-10-26T00:20:52+5:302014-10-26T00:20:52+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी भागवत
संघ मुख्यालयात चर्चा : सदिच्छा भेट की राजकीय चर्चा?
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी भागवत यांच्याशी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसह एकूणच राजकारणावर चर्चा केल्याची माहिती आहे.
शनिवारी सकाळी गडकरी मंत्रीपदाचा लवाजमा बाजुला ठेवून दुचाकीवरून वाड्यावरून संघ मुख्यालयाकडे निघाले. गडकरी दुचाकीवर निघाल्याचे कळताच माध्यम प्रतिनिधींनी संघ मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकच गर्दी केली. प्रवेश द्वारावर कुणाशीही न बोलता गडकरी सरळ आत गेले. गडकरी सुमारे अर्धा तास संघ मुख्यालयात होते. गडकरी आणि भाजपचे इतर ज्येष्ठ नेते दरवर्षी विजयादशमीला आणि दिवाळीला सरसंघचालकांची सदिच्छा भेट घेत असतात. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होती. परंतु, सध्याचे तापलेले राजकीय वातावरण बघता दिवसभर या भेटीबद्दल माध्यमांमध्ये चर्वितचर्वण सुरू होते. प्रत्येकजण आपापले तर्कवितर्क लढवत होते. भागवत व गडकरी यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. परंतु महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. भागवत शुक्रवारी रात्री दिल्लीहून नागपुरात परतले. त्यानंतर रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. (प्रतिनिधी)
उमा भारती - गडकरी भेट
केंद्रीय मंत्री उमा भारती शनिवारी सायंकाळी नागपुरात आल्या. रात्री ९ वाजता त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मी आपल्या भेटीसाठी येत आहे असा फोन उमा भारती यांनी गडकरी यांना रात्री ८.३० वाजता केला. तेव्हा गडकरी यांनी त्यांना भोजनाचे निमंत्रण दिले. या भेटीच्या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते.