मुख्यमंत्र्यांपेक्षा गडकरींवर विश्वास
By admin | Published: January 29, 2016 10:55 PM2016-01-29T22:55:29+5:302016-01-29T23:53:22+5:30
नारायण राणे : मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा करू नये
रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आपला अधिक विश्वास आहे, अशा स्पष्ट शब्दांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. एका बाजूला राज्य सरकारवर टीका करतानाच त्यांनी गडकरी यांच्यावर मात्र स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.
निमित्त होते मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या भूमिपूजनाचे. रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी गडकरी यांनी स्वत: नारायण राणे यांना निमंत्रण दिले होते. त्यानुसार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या राणे यांनी एका बाजूला गडकरी यांचे कौतुक आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारवर टीका, असे सणसणीत भाषण केले.
महामार्ग चौपदरीकरणाबाबतचा कार्यक्रम असला तरी आपण कोकणच्या व्यथा मांडणार असल्याचे सांगत राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची घोषणा केली आहे. मात्र, त्यासाठी जागा आहे का? त्याचे भूसंपादन झाले आहे का? असे प्रश्न त्यांनी केले. या प्रकल्पासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलाच नसल्याची माहिती मंत्रालयातून मिळाली असल्याचे राणे यांनी सांगितले.
नवे जंगल उभे करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आहेत ती जंगले वाचवावीत, असा टोलाही त्यांनी हाणला. सिंधुदुर्गातील रखडलेले विमानतळ, कोणत्याही कामासाठी उपलब्ध होत नसलेला निधी, आरोग्य केंद्र, शाळा आणि रस्त्यांची दुरवस्था अशा अनेक मुद्द्यांबाबत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनी नुसत्या घोषणा करू नयेत, कृती करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
गडकरी दिलेला शब्द पाळतात. माझा त्यांच्या शब्दावर विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. मुख्यमंत्री घाईघाईत येतात आणि पैसे न देता निघून जातात, असा टोला त्यांनी हाणला.
गडकरी यांच्यामुळेच चौपदरीकरणाच्या कामाला गती
आली असल्याचे राणे यांनी
सांगितले आणि उर्वरित प्रश्नांबाबतही गडकरी यांनी लक्ष घातले तर तेही
सुटतील, असा विश्वासही दाखवला. माजी मुख्यमंत्री म्हणून आणि चौपदरीकरणासाठी जास्तीत जास्त पाठपुरावा केला म्हणून गडकरी यांनीच आपल्याला येथे
बोलावले आणि गडकरी यांच्यामुळेच आपल्याला बोलायची संधी मिळाली, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. (प्रतिनिधी)