गडकरींच 'ते' वक्तव्य खरं ठरलं;'क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 10:00 AM2019-11-23T10:00:58+5:302019-11-23T10:25:46+5:30
ज्यावेळी आपल्याला वाटत आपण सामना हरतोय, त्यावेळी नेमकं त्याच्या उलट होतं असे गडकरी म्हणाले होते.
- मोसीन शेख
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षित वळण लागले असून आज सकाळीच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतली. तर धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे. हे एका रात्रीत घडलेले असल्याचे समजत आहे. त्यामुळे 'क्रिकेट आणि राजकरणात काही घडू शकतात' हे गडकरींचे वक्तव्य खरे ठरले असल्याचे बोलले जात आहे.
काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक फिस्कटली होती. यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे. त्यामुळे राजकरणात काहीही होऊ शकते हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या विषयी काही दिवसांपूर्वी सूचक वक्तव्य केले होते. 'क्रिकेट आणि राजकरणात काही घडू शकतात'. ज्यावेळी आपल्याला वाटत आपण सामना हरतोय, त्यावेळी नेमकं त्याच्या उलट होतं असे गडकरी म्हणाले होते. आज सकाळी घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता त्यांचे ते वक्तव्य तंतोतंत खरे ठरले असल्याचे पाहायला मिळत आहे.
तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते असले तरीही अध्यक्ष शरद पवार यांच्या संमती शिवाय पक्ष कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत अशी चर्चा होती. मात्र अजित पवारांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठींबा नसून, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचा खुलासा शरद पवारांनी केला आहे.