जिल्ह्यातील गडकोट, किल्ले मोजताहेत अखेरच्या घटका
By admin | Published: May 1, 2017 02:18 AM2017-05-01T02:18:34+5:302017-05-01T02:18:34+5:30
च डोंगरावर असलेल्या काळ्या पाषाणातील दगडधोंड्यांमधील गडकोटांवर शिवरायांनी स्वराज्याचे तोरण फडकाविले. हे साध्य
गोरख माझिरे / भूगाव
उंच डोंगरावर असलेल्या काळ्या पाषाणातील दगडधोंड्यांमधील गडकोटांवर शिवरायांनी स्वराज्याचे तोरण फडकाविले. हे साध्य करताना ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता या भूमीला पारतंत्र्यामधून मुक्त केले; परंतु हेच गडकोट किल्ले सध्या अखेरच्या घटका मोजताहेत.
महाराष्ट्राची संस्कृती जतन आणि संरक्षण करण्यासाठी त्या-त्या काळातील राजवटींनी या सह्याद्रीच्या माथ्यावर किल्ले उभारणी केली. आपापल्या गरजेनुसार गिरीदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट आणि जलदुर्ग अशा किल्ल्यांची उभारणी झाली. या दुर्गरत्नांनीच महाराष्ट्र प्रदेशाचे वर्षानुवर्षे रक्षण केले;परंतु बलस्थान असलेले गडकिल्ले मात्र आजही उपेक्षित आहेत. मजा, मस्ती, सेल्फीच्या नादात आपण त्या वास्तूंचे महत्त्वदेखील विसरलो. ऐतिहासिक स्थळी कोणत्याही परवानग्या न घेता मुक्काम करणे, गडावर आग लावणे, प्लॅस्टिकच्या बाटल्या पिशव्या गडावर फेकणे, गडावर मद्यपान करणे, अन्न शिजविणे, काचेच्या बाटल्या फोडणे, गडावरील एखादा दगड हलवण्याचा प्रयत्न करणे, कचरा टाकणे असो, किल्ल्यांच्या तटबंदी आणि बुरुजावर प्रेमीयुगुलांनी आपले नाव लिहिणे, ऐतिहासिक ठिकाणी दारू पिणे, नको तसे फोटो काढणे, असे प्रकार गडकिल्ल्यांवर सर्रास घडतात. असे गडकिल्ले अनेकांसाठी केवळ एक पिकनिक पॉइंट एवढेच राहिलेले आहे.या अशा ऐतिहासिक ठिकाणी पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष अशा प्रवृत्तींना खतपाणी घालणारे ठरतेय. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील इतिहास आणि गड-किल्ले तज्ज्ञ मंडळींचा समावेश असलेल्या गड-संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे. हे प्रयत्न होतील तेव्हा होतील. पण, आपण स्वत:ही आपली नैतिक जबाबदारी समजून यात पुढाकार घ्यायला हवा. किल्ले तिकोण्यावर श्री शिवदुर्ग संवर्धन ही संस्था दुर्गसंवर्धनाचे अविरत काम करते.
अन् गड बघून मन सुखावतं
या किल्ल्यावर कमरेला लाल शेला गुंडाळून आणि डोक्यात लाल फेटा चढवून मावळ्याच्या पांढऱ्या वेषात असलेला सुजीत मोहोळ नावाचा उमदा गडपाल सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो.
४सन २००८ पासून या संस्थेच्या वतीने गडपाल म्हणून कार्यरत आहे. गडावर जाईपर्यंत एकही प्लॅस्टिकची पिशवी, बाटली, इत्यादी कचरा दिसत नाही यावरूनच त्यांच्या कामाचा अंदाज येतो. दररोज गडावर जाणे, साफसफाई करणे, झाडांना पाणी देणे, गैरप्रकार घडताना दिसल्यास त्यास रोखणे, असं काम ते गडपाल या नात्याने करतात. त्यांना येणाऱ्या अडचणी अनेक आहेत.
मुळशीतील किल्ले हे पूर्णपणे दुर्लक्षित आणी असुरक्षित आसून किल्ले संवर्धनाचे काम काही मंडळे व संस्था करत आहेत. सरकारने किल्ल्यावर कसल्याही प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. सरकार व प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष करत आहे.
- राजेश नेळगे, दुर्गप्रेमी, पुणे
सरकारकडुन गडकिल्ल्यांसाठी निधी येतो, परंतु त्याचा वापर योग्य रितीने होत नाही, गडांसाठी काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांना हे काम दिल्यास योग्य प्रकारे काम होऊन, किल्ल्यावरील पर्यटन वाढण्यास हातभार वाढेल.
- पंडित अतिवाडकर,
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे