गायकवाडला पोलीस कोठडी
By admin | Published: April 4, 2017 04:31 AM2017-04-04T04:31:22+5:302017-04-04T04:31:22+5:30
शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड याला सोमवारी कल्याण न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कल्याण : शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेला शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड याला सोमवारी कल्याण न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
काळे यांच्यावर ८ मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास काही जणांनी जीवघेणा हल्ला केला होता. पोलीस तेव्हापासून हल्लेखोरांचा शोध घेत होते. सीसीटीव्ही फुटेजद्वारे कोळसेवाडी पोलिसांनी २१ दिवसांनी प्रशांत बोटे, अनिल जगताप, प्रशांत काटलेकर यांना अटक केली. त्यानंतर, गायकवाड यालाही नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून गजाआड केले. गायकवाड याचे एका शिवसेना पदाधिकारी असलेल्या बांधकाम व्यावसायिकाबरोबर अनेक वर्षांपासून वाद आहेत. याच व्यावसायिकाचे काळे यांच्याशीही वाद आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घेण्याचे गायकवाड याने ठरवले. त्यासाठी त्याने आपला मित्र प्रशांत यांच्यावर हल्ल्याचा डाव आखला होता. मात्र, मारेकरी सीसीटीव्हीत कैद झाले. त्यामुळे दुसऱ्याला अडकवण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात तो स्वत:च अडकला.
दरम्यान, अन्य आरोपी अनिल जगताप याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच मुलाची तब्येत बिघडल्याचा आरोप अनिलच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी तो फेटाळून लावला आहे. कारागृहात त्याला चक्कर आल्यामुळे त्याला उपचारासाठी दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>बाजारपेठ पोलीसही घेणार ताबा?
कल्याण-डोंबिवली मुख्यालयात २५ मार्चला शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. याप्रकरणी या दोन्ही नगरसेवकांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी गायकवाड याचा ताबा बाजारपेठ पोलीस घेऊ शकतात, असे असे पोलीस सूत्रांनी सांगितले.