गायकवाड यांच्यावरील विमानबंदी तूर्त कायम
By admin | Published: March 31, 2017 04:43 AM2017-03-31T04:43:05+5:302017-03-31T04:43:13+5:30
शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी तूर्त तरी कायम आहे. राजधानी दिल्लीत
नवी दिल्ली : शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी तूर्त तरी कायम आहे. राजधानी दिल्लीत ये-जा करण्यासाठी त्यांना आणखी काही काळ ट्रेननेच प्रवास करावा लागेल असे दिसते. शिवसेनेचे खासदार मात्र गायकवाड यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. पक्षाचे राज्यसभेतील नेते संजय राऊत म्हणाले, गायकवाड यांच्या कथित कृत्याची चौकशी अद्याप झालेली नाही. अशा कोणत्याही कृत्याचे शिवसेना समर्थन करीत नसली तरी विमान कंपन्यांचा सध्याचा व्यवहार गुंडागर्दीसारखाच आहे.
गायकवाडप्रकरणी शिवसेना खासदारांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. हवाई वाहतूक मंत्र्यांनाही या वेळी लोकसभाध्यक्षांनी बोलावून घेतले होते. मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत गायकवाडांवरील विमान प्रवास बंदी उठवण्याबाबत अद्याप काही मार्ग निघाला नाही. गायकवाडप्रकरणी भाजपाचे खा. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, एअर इंडिया ही काही कोणाची व्यक्तिगत मालमत्ता नाही. प्रश्न धोरणाचा आहे. एअर इंडियाने अशा प्रकारे चौकशी न करता कोणावरही प्रवासबंदी लादणे योग्य नाही. मात्र गायकवाड यांच्या मारहाणीचे कोणीच समर्थन करणार नाही. (विशेष प्रतिनिधी)