जुहू-विलेपार्लेतील संरक्षण खात्यालगतच्या इमारतींच्या पुनर्विकासाला परवानगी द्यावी- गजानन कीर्तिकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 03:17 PM2019-12-03T15:17:03+5:302019-12-03T15:47:02+5:30
जुहू-विलेपार्ले येथील संरक्षण खात्याच्या वायरलेस स्टेशनलगतच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी परवानगी देण्यात यावी,
मुंबई-जुहू-विलेपार्ले येथील संरक्षण खात्याच्या वायरलेस स्टेशनलगतच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी संसदेत केली आहे. सदर बाब आज संसदेत शून्य प्रहराच्या कालावधीत त्यांनी उपस्थित केली, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
जुहू-विलेपार्ले येथे संरक्षण खात्याचे वायरलेस ट्रान्समिशन स्टेशन आहे. त्याच्या हद्दीपासून ५०० यार्डाच्या अंतरावर अनेक जुन्या मोडकळीस इमारती खासगी जमिनीवर व म्हाडाच्या भूखंडावर वसल्या आहेत. तसेच काही प्रमाणात झोपडपट्टी देखील आहे. या इमारतींचे पुनर्बांधणी करणे व झोपडपट्ट्यांचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. या ट्रान्समिशन स्टेशनला सदर पुनर्विकासामुळे कोणताही अडथळा येणार नाही. याबाबत केंद्रीय संरक्षण दलाने अभिप्राय देखील दिले आहेत. परंतु संरक्षण विभागाने अद्याप ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्यामुळे सदर परिसरातील नागरीक पुनर्विकासापासून वंचित राहत आहेत अशी खंत त्यांनी शेवटी व्यक्त केली.