FTIIच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांना मुदतवाढ नाकारली
By admin | Published: March 3, 2017 12:54 AM2017-03-03T00:54:16+5:302017-03-03T10:30:23+5:30
एफटीआयआयमध्ये ज्यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत तब्बल १३९ दिवसांचा संप पुकारला त्या गजेंद्र चौहान यांना मुदतवाढ नाकारण्यात आली आहे.
पुणे : एफटीआयआयमध्ये( फिल्म अँड टेलिव्हिज इन्स्टिट्युट ऑफ इंडिया) ज्यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत तब्बल १३९ दिवसांचा संप पुकारला त्या गजेंद्र चौहान यांना अध्यक्षपदी मुदतवाढ नाकारण्यात आली आहे.
चौहान यांच्या नियुक्तीमुळे 'एफटीआयआय'मध्ये अक्षरश: महाभारत घडले होते. चौहान यांच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचे पर्व आज संपत असून मोदी सरकारने त्यांना मुदतवाढ नाकारून नारळ देण्याच निर्णय घेतला आहे. नव्या मंडळाची नियुक्ती पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आह.
केंद्र सरकारकडून चौहान यांच्या अध्यक्षपदाला मुदतवाढ मिळणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र मोदी सरकारने त्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान गुरूवारी चौहान यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये नियामक मंडळाची बैठक पार पडली. एफटीआयआयच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला मास्टर डिग्रीचा दर्जा मिळाल्याबद्दल तसेच सदस्य भावना सोमय्या यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. देशातील विविध शैक्षणिक संस्थांकडून अल्प कालावधीचे अभ्यासक्रम घेण्यासंबंधी विनंती पत्र एफटीआयआयला प्राप्त झाले. त्याबद्दल चर्चा करण्यात आली.
नियामक मंडळावरील नियुक्त्या या तीन वर्षांसाठी असतात. चौहान यांच्या अध्यक्षपदाची कारकिर्द ही ४ मार्च २०१४ पासून ग्राह्य धरण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ९ जून २०१५ रोजी एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर संस्थेतील विद्यार्थ्यांनी गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून रणकंदन माजवित आंदोलनाचे शस्त्र उगारले. १२ जून रोजी सुरू झालेला हा संप देशातील सर्वांत लांबलेल्या संपांपैकी एक ठरला. चौहान यांनी संप संपुष्टात आल्यानंतर ७ जानेवारी २०१६ ला अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
>चौहान यांच्या कारकिर्दीत निर्णय
नवीन व अद्ययावत अभ्यासक्रम. श्रेयांक व सेमिस्टर पद्धत. क्लासरूम थिएटर व अॅक्टिंग स्टुडिओ बांधणीच्या कामाला सुरुवात. इतिहासात पहिल्यांदाच नागरिकांसाठी ओपन डे. पदव्युत्तर पदवीच्या समकक्ष पदवीला मान्यता. जालियनवाला बाग व सेल्युलर जेलची प्रतिकृती उभारून क्रांतिकारकांना अभिवादन. फॅकल्टीसाठी मुलाखतीचा कार्यक्रम. कमी कालावधीचे अभ्यासक्रम. शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ
>अध्यक्षपदासाठी मला जो काही कालावधी मिळाला, त्या कमीतकमी कालावधीत विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेता आले, याचे समाधान आहे. केंद्राकडून अद्याप मुदतवाढीसंदर्भात कोणतेही पत्र मिळालेले नसले, तरी त्याचे दु:ख नाही. विद्यार्थ्यांच्या विरोधालाही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतले, कारण विरोध हा चांगल्या गोष्टींसाठी असायला हवा, त्याच्यातून काही चांगल्या गोष्टी घडू शकतील. साखरेलाही मीठ समजून विरोध होणार असेल, तर असा विरोध कोणत्याच कामाचा नाही. एक महिन्यापूर्वी मला एफटीआयआयमधील अभिनय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी भेटून गेले, मी कोणत्याही विद्यार्थ्याला कधीच चर्चेसाठी विरोध केला नाही आणि करणारही नाही.
- गजेंद्र चौहान, अध्यक्ष, नियामक मंडळ, एफटीआयआय