जुईनगरवासीयांच्या आरोग्याशी खेळ

By admin | Published: January 16, 2017 02:54 AM2017-01-16T02:54:00+5:302017-01-16T02:54:00+5:30

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधून रोज रात्री कारखान्यांमधील रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडले जात आहे.

Game with the health of the Juinagaras | जुईनगरवासीयांच्या आरोग्याशी खेळ

जुईनगरवासीयांच्या आरोग्याशी खेळ

Next

नामदेव मोरे,

नवी मुंबई - ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधून रोज रात्री कारखान्यांमधील रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडले जात आहे. रसायनांच्या असह्य दुर्गंधीमुळे जुईनगरमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुलांना खोकल्याचा व श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करूनही कोणीच दखल घेत नसल्याने जुईनगरवासीयांसाठी रोजची रात्र वैऱ्याची ठरत आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये घणसोली ते शिरवणे दरम्यान मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांमधील दूषित पाणी कोपरखैरणेमधील प्रक्रिया केंद्रामध्ये सोडणे बंधनकारक आहे. प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी खाडीत सोडणे अपेक्षित आहे. तुर्भे ते शिरवणेमधील कारखान्यांमधील पाणी सानपाडाजवळील साठवणी टाकीत आणले जाते. येथून पंपिंग करून ते कोपरखैरणेमध्ये सोडण्यात येते; पण नियमाप्रमाणे दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता रोज सूर्यास्तानंतर ते जुईनगरच्या नाल्यात सोडण्यात येत आहे. रात्री ८ नंतर जुईनगर रेल्वे स्टेशन समोरच्या पुलावर नाकावर रूमाल ठेवल्याशिवाय उभेही राहता येत नाही. या केमिकलचा वास मिलेनियम टॉवरपासून पूर्ण जुईनगर परिसरात पसरू लागला आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. लहान मुलांना खोकल्याचा प्रचंड त्रास होत आहे. वारंवार खोकला होत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय घशाचे विकार होऊ लागले आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी सह्यांची मोहीम राबवून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळालाही याविषयी तक्रार केली आहे; पण काहीही कारवाई केली जात नाही. अजून किती दिवस हा त्रास सहन करायचा? असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत. जुईनगर नाल्यात रसायनमिश्रित पाणी येते कोठून? याविषयी माहिती घेण्यासाठी दक्ष नागरिकांनी जुईनगरपासून नाल्यातून एमआयडीसीपर्यंत प्रवास केला. या वेळी धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. सानपाडाजवळील पंप हाऊसपासून नाल्यात रसायनमिश्रित पाणी येत असल्याचे लक्षात आले. येथील पंपहाऊसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याविषयी विचारले असता, त्यांनी येथील पाणी नाल्यात सोडले जात नाही. आम्ही ते पंपिंग करून कोपरखैरणेमधील प्रकल्पात सोडत असल्याचे सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात नाल्यात जाऊन पाहणी केली असता पंपिंग हाऊसमधील तलावातूनच पाणी नाल्यात जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नाल्यामध्ये सर्वत्र केमिकलचा थर साचला आहे. मध्यरात्रीनंतर केमिकलचे पाणी सोडणे बंद केले जाते. जुईनगरमधील हजारो रहिवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला.
>सूर्यास्ताचीच भीती वाटू लागली
जुईनगरमधील रहिवाशांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्हाला सूर्यास्ताची भीतीच वाटू लागली आहे. रात्री झाली की नाल्यात केमिकलचे पाणी सोडले जाते. प्रचंड दुर्गंधीमुळे श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. जुईनगर रेल्वेस्टेशन ते घरापर्यंत जातानाही नाकावर रूमाल ठेवावा लागत आहे. रोजच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचे व खोकल्याचे अजार होत आहेत. रात्रीस सुरू असलेल्या या खेळाची भीती वाटत असून हा त्रास थांबवावा, अशी मागणी केली आहे.
>जुईनगर नाल्यात रसायनमिश्रित पाणी सोडल्याने प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करूनही कारवाई होत नाही. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.
- विजय साळे,
वार्ड अध्यक्ष राष्ट्रवादी
>जुईनगरमधील नाल्यात वर्षानुवर्षे केमिकल मिश्रित पाणी सोडले जात आहे. प्रचंड दुर्गंधीमुळे रहिवासी त्रस्त आहेत. तक्रारी करूनही कोणीच दखल घेत नसून अजून किती वर्षे हा त्रास सहन करायचा.
- शशांक शेवते
वैभव सोसायटी
>जुईनगरमध्ये आम्ही १७ वर्षांपूर्वी राहण्यास आलो. तेव्हापासून केमिकलच्या दुर्गंधीचा त्रास सुरू आहे. रहिवाशांना श्वसनाशी संबंधित अजार होत आहेत. याविषयी आम्ही अनेक तक्रारी केल्या; पण प्रशासन दखल घेत नाही.
- शीला जाधव
महालक्ष्मी सोसायटी
>५ ते ६ वर्षांपासून आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत; परंतु प्रदूषण नियंत्रण व शासन काहीही कारवाई करत नाहीत. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना त्रास होत असून संबंधित कंपन्यांवर शासनाने कडक कारवाई करावी.
- सागर लकेरी
ओंकार सोसायटी
>१२०० नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
जुईनगरमधील राष्ट्रवादी काँगे्रसचे पदाधिकारी विजय साळे यांनी नाल्यातील दुर्गंधीविषयी सह्यांची मोहीम राबविली होती. १२०० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले होते. मुख्यमंत्री कार्यालयाने पत्र मिळाल्याचे कळवून कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्या; पण प्रत्यक्षात काहीही कारवाई झालेली नाही.

Web Title: Game with the health of the Juinagaras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.