गद्दारी केली म्हणून साथीदाराकडूनच गेम !
By admin | Published: February 12, 2017 08:22 PM2017-02-12T20:22:12+5:302017-02-12T20:22:12+5:30
साताऱ्यातील तडीपार गुंडाच्या खुनात पोलिसांनी त्याच्याच एका साथीदाराला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
आॅनलाइन लोकमत
कऱ्हाड (सातारा), दि. 12 - साताऱ्यातील तडीपार गुंडाच्या खुनात पोलिसांनी त्याच्याच एका साथीदाराला ताब्यात घेऊन अटक केली आहे. गुन्ह्यातील सहभागाची पोलिसांना माहिती देऊन तुरुंगात अडकवलं आणि चोरीच्या मुद्देमालात योग्य वाटणी दिली नाही, या कारणावरून आपण हा गेम केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत या खुनाचा उलगडा करून आरोपीला गजाआड केले.
अमोल बाबूराव पोळ (वय २८, रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. शहरानजीक बनवडी येथे अभिजित ऊर्फ नान्या तुळशीदास पवार (वय ३५, मूळ रा. लिंब, ता. सातारा) याचा शुक्रवारी रात्री धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. अभिजित ऊर्फ नान्या हा सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोड्याची तयारी असून, तब्बल ४७ गुन्हे नोंद होते. काही दिवसांपूर्वीच त्याला साताऱ्यातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर तो कऱ्हाडनजीक बनवडी येथील जलविहार कॉलनीत वास्तव्यास आला. त्याठिकाणी त्याने एक फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला. राहण्यास आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे नान्या एकटाच त्या फ्लॅटमध्ये वास्तव्य करीत होता. दरम्यान, शनिवारी दुपारी इमारतीचा सुरक्षारक्षक आधारकार्डची झेरॉक्स आणण्यासाठी गेला असताना नान्याचा खून झाल्याचे उघडकीस आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. अभिजित ऊर्फ नान्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याचा दुसऱ्या एखाद्या गुन्हेगाराने खून केल्याची शक्यता होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातच नान्याचा साथीदार अमोल पोळ याची माहिती पोलिसांना मिळाली. अमोल पोळ व नान्या या दोघांनी एकत्रितपणे दहापेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. त्यामुळे पोलिसांचा पोळवरील संशय बळावला. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकाने तातडीने पोळचा शोध सुरू केला. शनिवारी रात्रीच त्याला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.
नान्या व अमोल पोळने यापूर्वी जे गुन्हे केले होते, त्या गुन्ह्यात चोरून आणलेल्या ऐवजातील योग्य वाटणी नान्याने अमोलला दिली नव्हती. या गद्दारीमुळे त्याचा त्याच्यावर राग होता. तसेच यापूर्वी एका चोरीच्या गुन्ह्यात नान्याला अटक झाली होती. त्यावेळी पोलिस तपासात नान्याने अमोलचे नाव घेतले. त्यामुळे अमोललाही अटक झाली. नान्यामुळेच आपल्याला तुरुंगात जावे लागले. तसेच त्याने जामिनासाठीही आपल्याला मदत केली नाही, याचाही राग अमोलच्या डोक्यात होता. याच रागातून त्याने शुक्रवारी रात्री शस्त्राने वार करून नान्याचा खून केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी अमोल पोळ याला कऱ्हाड शहर पोलिसांच्या ताब्यात दिली असून, कऱ्हाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
त्याचाच कोयता, त्याचीच मान!
शुक्रवारी रात्री फ्लॅटमध्ये बसून अमोल व नान्याने एकत्रित मद्यप्राशन केले. त्यानंतर दोघेही झोपले. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अमोलला जाग आली. त्यावेळी फ्लॅटमध्ये एका कोपऱ्यात पडलेल्या कोयत्यावर त्याचे लक्ष गेले. नान्यावर राग असल्यामुळे त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने अमोल उठला. त्याने कोपऱ्यात पडलेला कोयता उचलून नान्याच्या मानेवर सपासप वार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दारूसाठी दोन बारवर पायपीट
अमोल शुक्रवारी दुपारीच बनवडी येथे नान्याकडे आला होता. रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास दोघेजण फ्लॅटमधून बाहेर पडले. त्यानंतर ते दारू पिण्यासाठी मसूर मार्गावरील एका बारवर गेले. मात्र, त्याठिकाणी त्यांचा किरकोळ वाद झाल्याने त्यांना दारू मिळाली नाही. त्यानंतर दोघे कऱ्हाडात आले. शहरातील एका बारमध्ये बसून त्यांनी यथेच्छ मद्यप्राशन केले. तसेच आणखी दारूच्या बाटल्या त्यांनी पार्सल घेतल्या होत्या, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
फ्लॅटवर सापडलेला फोटो पत्नीचा
पत्नी माहेरी गेल्यानंतर नान्यासोबत अन्य एक युवती संबंधित फ्लॅटमध्ये राहत होती, अशी माहिती शनिवारी पोलिसांना मिळाली होती. तसेच फ्लॅटमध्ये एका युवतीचा फोटो मिळाला होता. त्यामुळे पोलिस त्या युवतीच्या शोधात होते. मात्र, नान्यासोबत दुसरी कोणतीच युवती नव्हती. आणि फ्लॅटमध्ये सापडलेला फोटो त्याच्या पत्नीचाच होता, असेही पोलिसांनी सांगितले.
अमोलवर 12 गंभीर गुन्हे
अभिजित ऊर्फ नान्या आणि अमोल या दोघांनी मिळून अनेक गुन्हे केले आहेत. एकट्या अमोलच्या नावावर बारा गंभीर गुन्हे दाखल असून, चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोड्याची तयारी अशा गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे.