रुग्णाच्या जिवाशी खेळ!
By Admin | Published: July 19, 2015 01:30 AM2015-07-19T01:30:41+5:302015-07-19T01:30:41+5:30
ग्रामीण भागात अॅलोपॅथी डॉक्टर जायला तयार नाहीत. रुग्णालयात मनुष्यबळ नाही, अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा म्हणून ‘आयुष’ डॉक्टरांना एक वर्षाची औषधनिर्माण शास्त्राची परीक्षा
- डॉ. सरिता उगेमुगे
(लेखिका इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूरच्या सचिव आहेत.)
ग्रामीण भागात अॅलोपॅथी डॉक्टर जायला तयार नाहीत. रुग्णालयात मनुष्यबळ नाही, अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा म्हणून ‘आयुष’ डॉक्टरांना एक वर्षाची औषधनिर्माण शास्त्राची परीक्षा देऊन अॅलोपॅथीनुसार रुग्णसेवा करू द्यावी, हा घेतलेला निर्णय चुकीचा आहे, संबंधित पॅथीचा अपमान करणारा आहे, रुग्णाच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार आहे.
‘आयुष’ डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिसची परवानगी देताना फक्त औषधशास्त्राचा (तोही एक वर्षाचा) अभ्यासक्रम शिकवणे हे घातकच आहे. आधुनिक वैद्यक अभ्यासक्रम हा मुळात शरीरशास्त्रापासून ते मेडिसीनपर्यंत अनेक शाखांनी युक्त आहे. औषधशास्त्र हा त्याचा एक छोटासा भाग आहे. तसेच हा अभ्यासक्रम (एम.बी.बी.एस.) शिकत असताना तज्ज्ञ डॉक्टर-शिक्षकाबरोबर रुग्णांची पाहणी, तपासणी करणे व त्याआधारे त्याचे अचूक निदान करणे ही आधुनिक वैद्यक प्रॅक्टिसची सर्वांत महत्त्वाची पायरी आहे, कारण योग्य निदान झाले तरच तुमच्या औषधशास्त्राच्या ज्ञानाला अर्थ उरतो.
एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेला तुम्ही लक्षणे कशी नोंदवता आणि निदानापर्यंत कसे पोहोचता यालाच महत्त्व असते. पण औषधशास्त्र म्हणजेच ‘आधुनिक वैद्यक’ असा शासनाचा व न्यायालयाचा भ्रम झालेला दिसतो. आयुर्वेद व होमिओपॅथी या शाखा अॅलोपॅथीपेक्षा मूलत: आणि पूर्णत: वेगळ्या तत्त्वांवर निदान करणाऱ्या वैद्यकशाखा आहेत. म्हणून हे शिक्षण घेताना, आधुनिक वैद्यकाची निदान पद्धत (या शिक्षणाच्या प्रात्यिक्षकासह) शिकवली जात नाही. केवळ औषधशास्त्राचा अभ्यासक्रम ‘आयुष’ डॉक्टरांना शिकवून प्रॅक्टिस करण्याची परवानगी, हे धोकादायक ठरू शकते.
पुरोगामी महाराष्ट्रात हे प्रतिगामी धोरण
‘आयुष’ डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करू देण्याचा निर्णय हा पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामीकडे घेऊन जाणारा आहे. ‘आयुष’ डॉक्टरांनी ही मागणी करणे म्हणजे या पॅथीमुळे रुग्ण बरा होत नाही असाही होऊ शकतो. हा निर्णय समाजावर परिणाम करणारा आहे. एखाद्या प्रसिद्ध अॅलोपॅथी डॉक्टरच्या मुलाला एमबीबीएस करणे शक्य होत नसेल तर त्याला ‘आयुष’मधील एखाद्या पॅथीचे शिक्षण देऊन आपले इस्पितळ सुपुर्द करण्याचा मार्ग मोकळा केला जाऊ शकतो. सध्याच्या स्थितीत अॅलोपॅथीक डॉक्टर ‘अॅन्टीबायोटीक डोस’ ठरविण्यासाठीही स्पेशालिस्ट डॉक्टरांची मदत घेतात, अशावेळी या डॉक्टरांकडून होणारी प्रॅक्टिस शंका व्यक्त करणारी आहे.
...तर मग वैदू, बोगस डॉक्टरांनाही परवानगी द्यावी!
ग्रामीण भागात एम.बी.बी.एस. डॉक्टरांचा तुटवडा आहे व तिथे फक्त ‘आयुष’ डॉक्टरच काम करतात. उद्या
अगदी दुर्गम भागात आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरही जाण्यास तयार नसतील, तर
मग तिथे वैदू, बाबा, भगत, बोगस
डॉक्टर या सर्वांनाच ‘डॉक्टर उपलब्ध
नाही’ या सबबीखाली परवानगी
द्यावी लागेल.
अॅलोपॅथीची एवढीच आवड असेल तर एमबीबीएस करा
‘आयुष’मध्ये शरीर रचनाशास्त्राचा
अभ्यास केला जात नाही. यामुळे अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करू देणे योग्य नाही. अॅलोपॅथीविषयी एवढीच आवड असेल तर त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण घ्यावे. भविष्यात अनेक जण एमबीबीएसवर लाखो रुपये खर्च न करता ‘आयुष’चे शिक्षण घेऊन अॅलोपॅथीची प्रॅक्टिस सुरू करतील.
प्रत्येक पॅथीची प्रिन्सिपल्स आहेत
होमिओपॅथी, आयुर्वेद आणि अॅलोपॅथीचे वेगवेगळे ‘प्रिन्सिपल’ आहेत. त्या ‘प्रिन्सिपल’नुसार शिक्षण व उपचार केले जातात. या पॅथी एकामेकांत मिसळवून उपचार केल्यास याचा फायदा नाही तोटाच होण्याची शक्यता अधिक आहे. जगात याला कुठेही मान्यता नाही. अॅलोपॅथी सोडल्यास इतर पॅथी हळूहळू नामशेष होत आहे. या पॅथीच्या कॉलेजेसला दिवसेंदिवस विद्यार्थी मिळणे कठीण होत चालले आहे. काही कॉलेजस बंदही पडले आहेत. यात या निर्णयामुळे ही पॅथी फक्त नावापुरतीच राहण्याची शक्यता आहे.