विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ
By admin | Published: July 22, 2016 12:52 AM2016-07-22T00:52:48+5:302016-07-22T00:52:48+5:30
मनसेच्या वतीने कोंढवा खुर्द येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा महाराज शाळेला कुलूप लावा आंदोलन करण्यात आले.
कोंढवा : विविध समस्यांच्या पूर्ततेसाठी मनसेच्या वतीने कोंढवा खुर्द येथील पालिकेच्या संत
गाडगेबाबा महाराज शाळेला कुलूप लावा आंदोलन करण्यात आले.
कोंढवा खुर्द प्रभाग क्र.६३ मधील महापालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या संत गाडगेमहाराज विद्यालयात मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमाची शाळा असून, या शाळेत जवळपास ३५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.
परंतु, या शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी संख्येच्या प्रमाणात शिक्षक कमी आहेत. शिवाय, स्वच्छतागृह नेहमीच अस्वच्छ असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने अनेक विद्यार्थी वर्गाबाहेर फिरत असतात. अशा अवस्थेत येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. यासाठी शिक्षण मंडळाकडे निवेदन देण्यात आले. मात्र, तरीही याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मनसेच्या वतीने महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रभाग अध्यक्ष आरती बाबर यांच्या नेतृत्वाखाली शाळेला कुलूप लावा आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात रोहिणी रोकडे, सरिता सिरस, कलाबाई कामटे, पुष्पा शिंदे, रत्नप्रभा काळे, पारूबाई लोणकर, योगेश बाबर, सतीश शिंदे, माणिक ननावरे, अविनाश पवळे, अमित जगताप, सुदाम वांजळे, शेखर लोणकर, अजिंक्य ससाणे यांसह नागरिकांनी सहभाग घेतला.
>मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न असल्याने या समस्या त्वरित निवारण कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका बाबर यांनी या वेळी दिला. तर, मुलांच्या मूलभूत शिक्षणाच्या हक्काकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी शिक्षण मंडळ खेळ खेळत आहे, असा आरोप मनसेचे हडपसर विधानसभा अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी केला.