‘लोकमत’मुळे थांबला खेळाडूंच्या जीवाशी खेळ
By admin | Published: August 11, 2014 03:59 AM2014-08-11T03:59:47+5:302014-08-11T03:59:47+5:30
दनलाल धिंग्रा मैदानातील चिखलात फुटबॉल स्पर्धेत खेळताना शालेय विद्यार्थी-खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यात अनेक मर्यादा येत होत्या
पिंपरी : मदनलाल धिंग्रा मैदानातील चिखलात फुटबॉल स्पर्धेत खेळताना शालेय विद्यार्थी-खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यात अनेक मर्यादा येत होत्या. चिखलात पाय घसरून किंवा अडकून खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण वाढले होते. या प्रकारे खेळाडू जखमी होण्याचा धोका वाढला होता, या संदर्भात क्रीडा शिक्षकांनी तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत शहर आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
महापालिकेचे सहायक आयुक्त सुभाष माछरे, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, पर्यवेक्षक सुभाष पवार, पुणे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील, क्रीडाधिकारी श्रीकांत हरनाळे यांच्याकडे तीव्र शब्दांत रोष व्यक्त करीत, तक्रार नोंदविली. त्याची दखल घेत शहर आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांचे सामने शुक्रवारी थांबविण्यात आले. पाऊस थांबल्यानंतर हे सामने घेण्यात येणार आहेत.
हरनाळे यांनी सांगितले की, मैदानात जास्त चिखल झाल्याच्या क्रीडाशिक्षकांच्या तक्रारी आल्यामुळे सामने थांबविण्यात आले आहेत. यासंदर्भात क्रीडाशिक्षक व फुटबॉल पंचांशी चर्चा केली. १५ आॅगस्टनंतर पाउस कमी झाल्यानंतर त्या पुन्हा घेतल्या जातील.’’
क्रीडाकुलचे भगवान सोनवणे म्हणाले, ‘‘ यासंदर्भात माछरे व जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांच्याकडे तक्रार केली. चिखलात स्पर्धा घेऊन खेळाडूंच्या जीवाशी खेळू नये. तात्पुरता उपाय म्हणून खासगी शाळांच्या चांगल्या मैदानात स्पर्धा घ्याव्यात. पुढील वर्षांपर्यत यासंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढून फुटबॉलचे स्वतंत्र मैदान उभारावे.’’
पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व महापालिकेतर्फे विविध खेळांची आंतरशालेय स्पर्धा दर वर्षी घेतली जाते. यात पाचवी ते बारावीचे
हजारो विद्यार्थी-खेळाडू सहभागी होतात. यंदा एकूण ७२ खेळ प्रकाराच्या स्पर्धा आहेत.
फुटबॉल खेळाला सर्वाधिक प्रतिसाद लाभतो. १४, १७ व १९ वर्षांखालील ६ गटांत ३०० पेक्षा अधिक संघ सहभागी होतात. ही स्पर्धा दोन ते अडीच महिने चालते. यंदा २२ जुलैपासून लढती येथे सुरू झाल्या. (प्रतिनिधी)