पेपरवर्कपेक्षा प्रत्यक्ष मॅटवरील खेळ महत्त्वाचा
By admin | Published: May 18, 2016 05:54 AM2016-05-18T05:54:43+5:302016-05-18T05:54:43+5:30
प्रो कबड्डीच्या यंदाच्या मोसमासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात संरक्षकांसह उत्कृष्ट आक्रमक खेळाडूंचीही निवड करताना संघ समतोल करण्यावर भर दिला
रोहित नाईक,
मुंबई-भक्कम बचावासाठी ओळखल्या जाणाऱ्या बंगाल वॉरियर्स संघाने प्रो कबड्डीच्या यंदाच्या मोसमासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात संरक्षकांसह उत्कृष्ट आक्रमक खेळाडूंचीही निवड करताना संघ समतोल करण्यावर भर दिला. तरी, ‘‘पेपरवर्कच्या तुलनेत प्रत्यक्षात मॅटवरील कामगिरी अधिक महत्त्वाची आहे,’’ असे मत बंगाल वॉरियर्सचा कर्णधार नीलेश शिंदे याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले. तसेच, कबड्डीपटूही आता हायक्लास झाल्याचे नीलेशने नमूद केले.
मुंबईतील नावाजलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या लिलावाच्या दिमाखदार कार्यक्रमानंतर नीलेश म्हणाला, ‘‘नव्या मोसमासाठी झालेला लिलाव बंगाल वॉरियर्ससाठी खूप चांगला ठरला. ज्या रेडर्सची कमतरता होती त्यांची यंदा संघात एन्ट्री झाली आहे. नितीन मदने, सुरजीत सिंग यांच्यामुळे संघाला मजबुती आली आहे; शिवाय
आम्ही आमच्या ज्युनिअर खेळाडूंनाही संघात कायम राखण्यात यश मिळवले.’’
संघनिवडीबाबत नीलेशने सांगितले, ‘‘सध्या बंगाल वॉरियर्स कागदावर तरी पूर्णपणे समतोल आहे. आता मॅटवर सर्वोत्तम कामगिरी करणे हे महत्त्वाचे आहे. शेवटी प्रत्यक्ष सामन्यात उत्कृष्ट खेळाला किंमत आहे. पेपरवर्कला काहीही महत्त्व नसते. जेव्हा सर्वोत्तम खेळ होतो तेव्हाच यश मिळते.’’
बंगाल वॉरियर्स संघात मोठ्या प्रमाणात मराठी खेळाडूंचा समावेश आहे. याविषयी नीलेशने सांगितले, ‘‘संघात मराठी खेळाडूंचा समावेश करणे आमचे लक्ष्य नव्हते. आम्ही प्रत्येक खेळाडूवर एक विशिष्ट बजेट ठरवून त्यानुसार बोली लावली. व्यावसायिक कबड्डी स्पर्धांमध्ये मी, विशाल माने, गिरीश एर्नाक, सुरजीत सिंग आम्ही एकाच बीपीसीएल संघातून खेळतो. त्यामुळे आमच्यातील ताळमेळाचा फायदा बंगालला होईल. त्याचप्रमाणे अनुभवी विशाल माने संघात आल्याने तो बाजीराव होडगेची जागा भरून काढेल. यू मुंबासाठी विशालने अनेकदा चमकदार खेळी केली आहे. बंगालकडूनही तो चांगला खेळ करेल यात शंका नाही,’’ असेही नीलेश म्हणाला.
>बोली बजेटबाहेर
बंगाल वॉरियर्सने लिलावामध्ये उजव्या कोपरासाठी डी. सुरेशसाठी आणि डावा कोपरासाठी जीवा कुमारसाठी खूप प्रयत्न केले, परंतु दोघांची बोली बजेटबाहेर गेल्याने प्रयत्न सोडून दिल्याची माहिती नीलेशने या वेळी दिली.
तसेच प्रत्येक संघाने चांगल्या खेळाडूंची निवड केली. परंतु,‘अ’ श्रेणीच्या खेळाडूंचा विचार केल्यास बंगालसह, तेलगू टायटन्स, यू मुंबा, पुणेरी पलटन व पटना पायरेट्स यांनी उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली असल्याचेही नीलेश म्हणाला.
कबड्डीला खूप चांगले दिवस आले आहेत. देशात यापूर्वी मिडल किंवा लो क्लासमध्ये असलेले कबड्डीपटू आज हायक्लासमध्ये आले आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये कबड्डीपटूंचा लिलाव होत आहे ही कबड्डीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. याआधी खेळाडू गेट वे आॅफ इंडियाला येऊन केवळ फोटो काढायचे. मात्र यानिमित्ताने याच गेट वेच्या समोरील पंचतारांकित हॉटेलमध्ये लिलावात सहभागी होत आहेत, याचा अभिमान आहे.
- नीलेश शिंदे