गेम करणारे गेम...! तुमच्याही मुलांकडे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 11:23 AM2024-08-04T11:23:24+5:302024-08-04T11:24:13+5:30

सतत गेमिंग करणाऱ्या माणसांमध्ये, मुलांमध्ये प्रचंड एकलकोंडेपणा असतो. अनेक मुलं त्यांच्या खोल्यांमध्येच रमतात. त्यांना त्या जगातून बाहेर पडावंसंच वाटत नाही. तुमचीही मुलं असं वागतात का? ...तर त्यांचे मोबाइल तपासून पाहा... 

Games that make games; Do have in your children mobile too | गेम करणारे गेम...! तुमच्याही मुलांकडे आहेत का?

गेम करणारे गेम...! तुमच्याही मुलांकडे आहेत का?

मुक्ता चैतन्य, संस्थापक, सायबर मैत्र

पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात घडलेली घटना अतिशय धक्कादायक होती. काही वर्षांपूर्वी ‘ब्लू व्हेल’ गेम खेळताना कुठलेसे टास्क पूर्ण करायचे म्हणून मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी आपण सगळेच हादरून गेलो होतो. पिंपरीत घडलेली घटनाही गेमिंगमधूनच घडली असल्याचं प्रथमदर्शनी समजते आहे. गेमिंगमधले कुठलेसे टास्क पूर्ण करण्यासाठी दहावीत शिकणाऱ्या मुलाने राहत्या बिल्डिंगच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारली आणि तो त्यात दगावला. इंटरनेट गेमिंग आणि मोबाइल गेमिंग या विषयात मी गेली जवळपास १५ वर्षे काम करत आहे आणि फायद्यापेक्षा त्याचे तोटेच अधिक असल्याचं आजवर कामातून लक्षात आलं आहे. हे दुष्परिणाम मानसिक, भावनिक पातळीवर मुलांनी विस्कळीत करत नेतात असं अनेकदा लक्षात आलेलं आहे. कारण एखादा गेमिंग करणारा युजर परत-परत गेम्स खेळायला यावा, यासाठी त्या गेमिंगच्या डिझाइनमध्येच अनेक ट्रिगर्स असतात. 

सतत आकर्षित करणारे ‘ट्रिगर्स’
हे ट्रिगर्स निरनिरळ्या प्रकारचे असतात. उदा. स्पर्धा, लेव्हल पार करणं, पॉइंट्स, गिफ्ट्स, मेडल्स मिळवणं. आपण जे नाही ते जगण्याची संधी मिळणं, शक्तिशाली बनणं, पिअर प्रेशर असे अनेक ट्रिगर्स असतात. ज्यासाठी गेमिंग पुन्हा- पुन्हा करावं असं वाटू लागतं आणि त्याची सवय होते.
गेमिंग हा एक व्यवसाय असल्यामुळे ग्राहकांनी परत-परत यावं, यासाठी हे ट्रिगर्स निरनिराळ्या पद्धतींनी जाणीवपूर्वक डिझाइनचा भाग बनलेले असतात; पण त्यामुळे अनेकदा आपण यात किती गुंतत जात आहोत, त्यासाठी आपण किती वेळ देतो आहोत, या सगळ्यांचे आपल्यावर काही भावनिक, मानसिक परिणाम होत आहेत का? या कशाचाही विचार करायला आपल्याला वेळ मिळत नाही.
सतत गेमिंग करणाऱ्यांमध्ये प्रचंड एकलकोंडेपणा असतो. अनेक मुलं त्यांच्या खोल्यांमध्येच रमतात. त्यांना त्या जगातून बाहेर पडावंसंच वाटत नाही. गेमिंग कमी कर असं म्हटलेलं आवडत नाही. कारण गेमिंग हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलेला असतो.

‘रेड अलर्ट’ ओळखा...
- गेमिंगची गुंतागुंत दिसते त्यापेक्षा बरीच किचकट असते. मेंदूला सवय लागली की, अवलंबत्व आणि पुढे व्यसन हा प्रवास सुरू होतो. त्यात मानसिक, भावनिक पातळीवरचं प्रचंड नुकसान व्हायला सुरुवात होते.
- नात्यांमध्ये अडचणी येतात. नाती सहज-सुंदर राहत नाहीत. मुलांच्या अभ्यासावर याचा परिणाम होतो. त्यांच्या वर्तणुकीत अनेक बदल दिसायला लागतात. कालपर्यंत सगळ्यांशी मिळून-मिसळून वागणारी मुलं एकलकोंडी बनतात. चिडचिडी होतात.
- संवाद साधण्यामध्ये त्यांना अडचणी येतात. गेमिंग, मोबाइल याच्याबद्दल बोललं की, त्यांना राग येतो. कारण तो त्यांचा ‘कम्फर्ट झोन’ बनलेला असतो. त्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडायची त्यांची तयारी नसते. 
- आई-वडील फोन काढून घेतील या भीतीने ती आक्रमक बनतात. ही सगळीच व्यसनाधीन होण्याची लक्षणं आहेत. अनेक मुलांना गेमिंगमध्ये जे काही चालू असतं, तिथे जी चित्रं त्यांच्या नजरेसमोर फिरत असतात तीच झोपेत स्वप्नात दिसत राहतात. दिवसाही शाळा, कॉलेजला गेल्यावर डोक्यात गेमिंगचेच विचार घोळत राहतात. ते जे काम करत असतात ते पटकन उरकून कधी एकदा गेमिंग करायला मिळेल असं त्यांना वाटायला लागतं. हे सगळेच ‘रेड अलर्टस’ आहेत. 

दिरंगाई मुलांसाठी ठरेल घातक
जर आपलं गेमिंग करणारं मूल एकलकोंडं बनलं असेल, त्याच्या वर्तणुकीत ठळक बदल दिसत असतील, ते चिडचिडं किंवा आक्रमक बनत असेल तर त्याच्यावर गेमिंगचा परिणाम होतो आहे, हे लक्षात घेऊन ताबडतोब समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ यांची मदत घेतली पाहिजे. यात दिरंगाई करणं मुलांसाठी अतिशय घातक असतं हे समजून घेणं आवश्यक आहे. वेळेवर मिळालेली मदत मुलांना गेमिंगच्या चक्रव्यूहातून बाहेर काढून शकते.

 

Web Title: Games that make games; Do have in your children mobile too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल