उमरखेडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक
By admin | Published: September 16, 2016 02:10 AM2016-09-16T02:10:04+5:302016-09-16T02:14:16+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीवर गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता एका गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली.
उमरखेड (यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीवर गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता एका गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली. त्यात ५ पोलीस कर्मचाऱ्यांसह १६ जण जखमी झाले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला हवेत गोळीबार करावा लागला. त्यांनी पाच राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येते.
तांबोळीपुरा येथील छावा गणेश मंडळाची मिरवणूक नाग चौकाच्या वाटेवर आली असताना अचानक दगडफेक झाली. त्यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक व पोलिसांचाही गोंधळ उडाला. या दगडफेकीत राज्य राखीव पोलीस दलाचे जवान रवींद्र शेडवाने, पोलीस कर्मचारी प्रशांत वानखडे, देवीदास कांबळे, चक्रधर नरवाडे, राठोड यांच्यासह पांडुरंग गव्हाणे, संतोष गव्हाणे, रामभाऊ खंदारे, गणेश पाटील, राजेंद्र बोंगिनवार, कृष्णा सूर्यवंशी, अशोक शिमरे, संजय कदम, रवी टेकाळे, सावन भोकरे, गजानन नंदनवार आदी जखमी झाले. त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
गंभीर जखमी असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना नांदेडला रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळावर प्रचंड गोंधळ उडाला. नागरिकांची पळापळ झाली. व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. बराचवेळ दगडफेक सुरू राहिल्याने पोलिसांनी सुरुवातीला लाठीचार्ज व नंतर गोळीबार केला.
उमरखेड ठाण्यातील एका अधिकाऱ्याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधील चार ते पाच राऊंड हवेत फायर केल्याचे प्रत्यक्षदर्शी पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विसर्जनासाठी निघालेल्या अन्य गणेश मंडळांनी आधी दगडफेक करणाऱ्यांना अटक करा, नंतरच विसर्जन होईल, अशी भूमिका घेतल्याने तणाव वाढला. गणेश मंडळाच्या या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. जेथे दगडफेक झाली तो मिरवणुकीचा मुख्य मार्ग नसल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह उमरखेडकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात यवतमाळ, पुसद, वणी, दारव्हा, दिग्रससह अन्य भागात मात्र गणेश विसर्जन शांततेत सुरू होते.
तर अकोला येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशभक्त धावत सुटल्याने एकच गोंधळ उडाला. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे उडालेल्या धावपळीमुळे दोन चिमुकले किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास कोठडी बाजारनजीकच्या चौकात घडली.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही गणेशभक्त धावत जाण्याचा प्रयत्न करीत होते. पोलीस कर्मचारी त्यांना शांततेने जाण्यासाठी सांगत होते; परंतु गणेशभक्त ऐकत नव्हते. शेकडो गणेशभक्त अचानक धावत सुटल्याने गदीर्तील नागरिक घाबरून गेले आणि तेसुद्धा रस्त्याने पळायला लागले. चेंगराचेगरीची शक्यता असल्याने पोलिसांनी धावणाऱ्या काही गणेशभक्तांवर सौम्य लाठीमार करून त्यांना चौकाच्या बाहेर काढले. त्यामुळे उडालेल्या धावपळीत दोन चिमुकले किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी तात्पुरता उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.