गानसरस्वती किशोरी आमोणकर
By admin | Published: March 8, 2017 08:49 PM2017-03-08T20:49:11+5:302017-03-08T20:49:11+5:30
वेदान्ताचं सार सुरांतून उलगडून दाखविण्याचं सामर्थ्य असलेली बहुधा एकमेव गायिका असे वर्णन केले जाते, ते फक्त किशोरी आमोणकरांचेच
Next
>वेदान्ताचं सार सुरांतून उलगडून दाखविण्याचं सामर्थ्य असलेली बहुधा एकमेव गायिका असे वर्णन केले जाते, ते फक्त किशोरी आमोणकरांचेच. रसिकांसाठी साक्षात सरस्वती. उभ्या भारतासाठी गानसरस्वती. परिपूर्णतेचा ध्यास, सुरांवरील श्रद्धा आणि तर्कशुद्ध निष्ठा यातून जे मनस्वी व्यक्तित्व साकारले आहे, ते किशोरीताई म्हणून ओळखले जाते, सच्च्या निर्भेळ सुरांवरची आपली श्रद्धा श्रोत्यांकडे संक्रमित करण्याच्या किमयेने या गानसरस्वतीची गायकी अलौकिक बनली.
मोगुबाई कुर्डीकरांसारख्या कडक गुरूच्या पोटी जन्माला आलेल्या या बाईनं गायकीच्या पुरुषार्थाची चौकट स्वकर्तृत्वाने रुंद केली. मनाला येईल तेव्हा मोडलीदेखील. त्यांनी मापदंड निर्माण केले, तेही नक्कल करण्याच्या आवाक्याबाहेरचे. शास्त्रीय संगीतातील साचेबद्ध घराण्याच्या चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या किशोरीताईंनी रससिद्धांताला जन्म दिला. सुरांच्या मांगल्याचं नवं घराणंच जणू या गानसरस्वतीपासून सुरु झालंय. गायकीतल्या त्यांच्या प्रयोगांमधून साकारलेल्या आविष्कारांनी रसिकांच्या मनावर कायमचे गारूड केले.
भावगीत, चित्रपट संगीत या वहिवाटीच्या वाटेवर त्यांचे सूर फारसे कधी रेंगाळलेच नाहीत. तरीही संतवाणी, मीरेची भजनं किंवा भावगीतही त्यांच्या सुरांनी आणखी मंगल केली.