‘सफाई’मध्ये गांधी-आंबेडकरवादाचा समन्वय!
By admin | Published: May 16, 2016 02:49 AM2016-05-16T02:49:35+5:302016-05-16T02:49:35+5:30
द्ध मार्क्सवाद, शुद्ध स्त्रीवाद यांचीही सूत्रे आपल्याला सफाईत सापडतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
मुंबई : महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत एकच आहे. हा भारत हिंदू नाही, तर सेक्युलर असावा, अशीच या दोघांची धारणा होती. सुमेध वडावाला रिसबूड यांच्या सफाई कादंबरीत गांधी आणि आंबेडकरांना अपेक्षित असलेली जातीपलीकडे जाण्याची भूमिका ठामपणे मांडली आहे. इतकेच नव्हे, शुद्ध मार्क्सवाद, शुद्ध स्त्रीवाद यांचीही सूत्रे आपल्याला सफाईत सापडतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
हिताय फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्त ‘सफाई’ कादंबरीच्या लेखनासाठी ज्येष्ठ साहित्यिक सुमेध वडावाला रिसबूड यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता साहित्य पुरस्कारदेखील या वेळी प्रदान करण्यात आला. त्या वेळी सबनीस बोलत होते.
या प्रसंगी साहित्यिक सुमेध वडावाला-रिसबूड, ‘लोकमत’चे फोटो एडिटर सुधारक ओलवे, पालिकेतील सर्वाधिक शिकलेले सफाई कर्मचारी (एम.फिल) सुनील यादव, तसेच हिताय फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधान मोंदींनी केवळ एक दिवस हातात झाडू घेऊन काहीही होणार नाही, तर संपूर्ण यांत्रिकीकरणाद्वारे आता सफाईची कामे व्हायला हवीत. एका विशिष्ट समाजाने आता आणखी किती वर्षे सफाई करायची, अन्यथा सवर्णांनीच यापुढे सफाईची कामे करावीत, असे परखड मतही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
एमफिल पदवी संपादन केल्यानंतरही दररोज हातात झाडू घेऊन सफाई काम करणारे पालिका कर्मचारी सुनील यादव यांनीही या वेळी आपली मते व्यक्त केली. ‘हिताय फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात सुमेध वडावाला रिसबूड यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर समता साहित्य पुरस्कार, मानपत्र, शाल-श्रीफळ व रोख पन्नास हजार रुपये देण्यात आले. (प्रतिनिधी)