गांधी घराण्याची गरीबी हटली; लोकांची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 06:27 AM2019-04-10T06:27:46+5:302019-04-10T06:28:53+5:30

उद्धव ठाकरे : राहुल गांधी, काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका

Gandhi family's poverty has disappeared; Not the people | गांधी घराण्याची गरीबी हटली; लोकांची नाही

गांधी घराण्याची गरीबी हटली; लोकांची नाही

Next

मुंबई : राहुल गांधी गरीबी हटावची घोषणा करताहेत. याआधी त्यांच्या आजीबार्इंनी याची सुरूवात केली होती. त्यांची गरीबी हटली, पण लोकांची नाही. काँग्रेस देशद्रोहाचे कलम हटवू पाहत आहे. हाच मोठा देशद्रोह आहे. हे कलम काढल्यास दाऊद येऊन काँग्रेसचा नेता बनेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.


दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी महालक्ष्मी रेसकोर्सजवळ आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशद्रोह्यांना गोंजारणारे, क्रांतीकारकांना कायर म्हणणाऱ्यांच्या हाती देश देऊ नका. मी अमित शहांचा अर्ज भरायला गेलो, तर माझ्यावर टीका झाली. राष्ट्रवादीवाले म्हणतात, तुम्ही यांच्या शामियानात कसे? त्यांच्या पोटात का दुखतय? अरे याच तंबूत तुम्ही आधी झाडलोट करायला गेला होता, असा सवालही त्यांनी केला.


‘देवरांना महापौर बाळासाहेबांनी केलं’
मिलिंद आमच्या अंगावर येताना जपून ये. तुझ्या वडिलांना ओळख माझ्या वडिलांनी दिली. बाळासाहेबांनी मुरली देवरा यांना महापौर केले नसते, तर आज मुंबईकरांना ते कोण? हे कदाचीत माहित नसते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.


मराठवाड्यातील जुलमी निजामाची राजवट संपविण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल खंबीरपणे पाठिशी राहिले. तसे इथल्या जनतेला आणि महाराष्ट्रातील सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन उद्घव ठाकरे यांनी केले. लातूर-उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्घव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारसभेत पहिल्यांदाच औसा येथे मंगळवारी एकत्र आले. ठाकरे म्हणाले, भाजपने केलेला जाहीरनामा वाचून आनंद झाला. कलम ३७०, राममंदिर आणि शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. युती होण्याचे हेच कारण आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा मात्र थापा आहेत. राहुल यांच्या आजींपासून गरिबी हटावचा नारा सुरु आहे. त्यांची गरिबी हटली मात्र लोकांचे काय
झाले, अशी टीका ठाकरे यांनी केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्घ कठोर भूमिका घेतली. परंतु आमची अपेक्षा आहे, एकदाच काय तो घाव घाला. म्हणजे पाकिस्तान पुन्हा कुरापत काढणार नाही. तुम्ही राज्याच्या पाठिशी आहात, आणखी मजबुतीने आशीर्वाद द्या, कर्जमाफीतील जाचक अटी दूर करा. विमा कंपनीला वठणीवर आणा, असे ते म्हणाले.

Web Title: Gandhi family's poverty has disappeared; Not the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.