गांधी घरातून होणार गांधी विचार दर्शन!
By admin | Published: October 2, 2016 02:41 AM2016-10-02T02:41:48+5:302016-10-02T02:41:48+5:30
महात्मा गांधी सप्ताहानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा उपक्रम.
ब्रह्मनंद जाधव
बुलडाणा, दि. 0१- महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणे अंतर्गत बुलडाणा तालुक्यातील पाडळी येथे गांधी घराची स्थापना करण्यात आली. दरम्यान, २ ऑॅक्टोबर गांधी जयंतीनिमित्त पाडळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह राबविण्यात येणार असून या सप्ताहामध्ये गांधी घरातून गांधी विचारांचे दर्शन होणार आहे.
महात्मा गांधीजींचे जीवन चरित्र, त्यांचे विचार सर्वसामान्यांमध्ये पोहचविण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणेची स्थापना करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधीजींविषयी सतत माहिती पुरविण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणेच्यावतीने बुलडाणा जिल्ह्यातील पाडळी येथे गांधी घराची स्थापना करण्यात आली. पाडळी येथील गांधी घरांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती, जागतिक अहिंसा दिन व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त पाडळी येथील गांधी घरामध्ये २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह साजरा केला जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहामध्ये महात्मा गांधीजींचे जीवन चरित्र व त्यांचे विचार सर्वसामान्र्यांपर्यंत पोहचविण्याचे मोठे कार्य होणार आहे. त्याचबरोबर शांती मार्च, ग्रामसफाई, प्रार्थना व महात्मा गांधी विचार दर्शन होणार आहे. तसेच या सप्ताहामध्ये व्यसनमुक्तीसाठी जनजागृती व मोफत कायदेविषयक शिबिरही घेण्यात येणार आहे. गांधी घर, गांधी विचारमंच, गांधी महिला मंच, गांधी युवामंच व पाडळी ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह राबविण्यात येत आहे. सप्ताहामध्ये पश्चिम विदर्भातील नागरिकांचा सहभाग होणार आहे. तसेच या सप्ताहमधून महात्मा गांधीजींच्या विचाराचे दर्शन होणार आहे.
गांधीवादी विचारांना मिळणार उजाळा!
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे पुणेसह औरंगाबाद, नागपूर येथेसुद्धा मुख्य कार्यालय आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणे अंतर्गत विविध कामे करण्यासाठी पाडळी येथे गांधी घर शाखा स्थापन करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणेच्यावतीने पाडळी येथील गांधी घर या ठिकाणी ग्रंथालय, अभ्यासिका निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच गांधीवादी विचारावर शिबिरे, महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन यासारखे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. तसेच या गांधी घरातून गांधी जयंतीनिमित्त आयोजित महात्मा गांधी सप्ताहामध्ये गांधीवादी विचारांना उजाळा मिळणार आहे.
गांधी घर स्थापनेला २१ वर्षपूर्ण
गांधीजींची विचारसरणी, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव नेमका कसा होता, हे नव्या पिढीला सांगण्याचं कार्य चालू ठेवण्यासाठी बुलडाणा जिलतील पाडळी येथे महाराष्ट्र गांधीस्मारक निधी, पुणे या संस्थेद्वारे १९५५ मध्ये गांधी घराची स्थापना करण्यात आली. पाडळी येथील गांधी घर स्थापनेला २१ वर्षपूर्ण होत असून, महात्मा गांधीजींचे विचार नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आजही या गांधी घरातून होत आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांचे स्मरण करण्याच्या निमित्ताने पाडळी येथील गांधी घरामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहात विविध कार्यक्रम होत आहेत.