गांधी वाडा : प्रशस्त मंडपाची उभारणी; दर्शनबारीचा दर्शनी भाग मुक्कामासाठी उपलब्ध
By admin | Published: June 28, 2016 01:32 AM2016-06-28T01:32:28+5:302016-06-28T01:35:43+5:30
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे उद्या (मंगळवारी) दिमाखात प्रस्थान होणार आहे.
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे उद्या (मंगळवारी) दिमाखात प्रस्थान होणार आहे. या प्रस्थानानंतरचा पहिला मुक्काम असलेले आजोळघर माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. देवस्थानच्या वतीने आजोळघराच्या जागी असलेला जुना वाडा, ज्याला गांधीवाडा असे म्हणत तो पाडून त्या जागी प्रशस्त असा सभामंडप व दर्शनबारी उभारण्यात आली आहे. याच दर्शनबारीचा दर्शनी भाग मुक्कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रशस्त जागेत वाड्यातील जुन्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे छोटे मंदिर उभारले आहे. या मंदिरासमोरच पालखी मुक्कामासाठी ठेवली जाणार आहे. भक्तांचे योग्य नियोजन होऊन सर्वांना पालखीचे दर्शन घेता येईल, अशी सोय देवस्थानतर्फे करण्यात आली आहे. पावसाचा त्रास मुक्कामाच्या ठिकाणी होऊ नये याकरिता लोखंडी पत्रे वापरून आजोळघरासमोर प्रशस्त मंडप उभारला आहे. आजोळघराच्या चारही बाजूंनी प्रकाशव्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण मंडप सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहे.
पोलिसांच्या वतीनेदेखील मुक्कामाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भक्तांना सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. गतवर्षी येथील मुक्कामच्या जागेवरून बरेच आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यासाठी पालखी प्रस्थानासाठी उशीरही झाला होता. त्या आक्षेपांची दखल घेऊन यंदा देवस्थानकडून येथील बांधकामात काही बदल करण्यात आले आहे.
>पालखी प्रस्थानानंतर ती आजोळघरी मुक्कामाला राहते ही परंपरागत चालत आलेली प्रथा असून, हे आजोळघर म्हणजे संत ज्ञानेश्वरमहाराज व त्यांच्या भावंडांचे
आजोळ आहे.
पूर्वी माऊली वारीला निघत तेव्हा पहिला मुक्काम आपल्या आजोळी श्रीयुत गांधी यांच्याकडे करत म्हणून तीच प्रथा पुढे पालखी सोहळ्यात रुजू झाल्याचे भक्त सांगत असतात.
कालांतराने येथील जुना मातीचा दगडी वाडा ज्याची ओळख गांधीवाडा अशी होती, तो दर्शनबारी व इतर कारणांसाठी पाडावा लागला, तरी येथील रूढ झालेली मुक्कामाची परंपरा विनाखंड सुरूआहे.
आजही भक्तांची ओढ पालखी प्रस्थान झाल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी आजोळघराकडे लागलेली असते. यंदाही पालखी प्रस्थान झाल्यानंतर ग्रामप्रदक्षिणा घालून आजोळघरी स्थिरावणार आहे.
त्यानंतर समाज आरती होऊन दिंड्याही आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी जातील. भक्तांना दर्शन खुले केल्यानंतर जागर होऊन पहाटे माऊली पंढपूरसाठी प्रस्थान ठेवतील आणि आजोळघर पुन्हा माऊलींचा वर्षभराचा दुरावा घेऊन रिकामे होईल.
आळंदी : माऊलींच्या पायी वारी पालखी सोहळ्यातील श्रींचे मानाचे अश्व कर्नाटकातील अंकलीहून आळंदीत शाही लवाजम्यासह सोमवारी (दि. २७) पुण्याहून निघाल्यानंतर इंद्रायणी नदीलगतच्या हरप्रीतसिंह सरदार बिडकर यांच्या वाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात अश्वपूजा आणि पाहुणचार घेऊन आळंदीत दाखल झाले.
प्रथा-परंपरांचे पालन करीत अश्व आळंदीसमीप आल्याचा सांगावा आळंदी मंदिरात आल्यानंतर श्री गुरू हैबतरावबाबा यांचे दिंडीने हरिनाम गजरात जाऊन स्वागत केले. पूजा, प्रसाद, नैवेद्य, स्वागत झाल्यानंतर श्रींचे वैभवी अश्व अलंकापुरीत प्रवेशले. या प्रसंगी श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरदार, बाबाराजे शितोळे सरदार,अश्व चोपदार तुकाराम कोळी, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, योगेश देसाई, विकास ढगे पाटील, अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब आणि उद्धव चोपदार, जनहितचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, पृथ्वीराज बावीकर, उमेश बिडकर, रवीकुमार बिडकर, स्वामी सुभाषमहाराज, संतोष साबळे, शंकर लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अश्वांच्या दर्शनास भाविक व नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून दर्शन घेतले.
माऊली मंदिरात अश्व प्रदक्षिणा, पूजा झाल्यानंतर फुलवाले धर्मशाळेत मुक्कामास मार्गस्थ झाले.