डॅडीची गांधीगिरी! गांधी विचार परीक्षेत डॉन अरुण गवळी ‘टॉपर’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 12:16 AM2018-08-13T00:16:27+5:302018-08-13T00:16:55+5:30
लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात भाईगिरी करणाऱ्या मुन्नाभाईवर गांधी विचारांचा प्रभाव पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आता असा प्रकार प्रत्यक्षातही घडला आहे.
नागपूर - लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात भाईगिरी करणाऱ्या मुन्नाभाईवर गांधी विचारांचा प्रभाव पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आता असा प्रकार प्रत्यक्षातही घडला आहे. अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या अरुण गवळीवर सध्या गांधीगिरीचा प्रभाव झाल्याचे दिसतोय. नागपूरच्या कारागृहात घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत ‘डॉन’ अरुण गवळीने चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे.
गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना कारागृहात पाठविण्यात येते. यात हत्या, दरोडे, बलात्कार सारखे गंभीर गुन्हे करणाºया कैद्यांना डांबले जाते. शिक्षा भोगल्यानंतर या कैद्यांमध्ये खरोखरच परिवर्तन होते का, हा खरा प्रश्न आहे. कारागृह ही शिक्षा भोगण्यापेक्षा कैद्यांसाठी प्रायश्चित्त करण्याचे स्थान असावे ही महत्त्वाची संकल्पना आहे. कदाचित याचा विचार करून कारागृहात शिक्षणातून परिवर्तन घडविण्यासाठी गांधी विचार परीक्षेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. दरवर्षी या कारागृहातील अनेक बंदिजन परीक्षा देतात. यावर्षीही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये १६० कैद्यांनी सहभाग नोंदविला. त्यांना अभ्यासासाठी गांधी विचारांची पुस्तकं पुरविण्यात आली. नागपूरच्या कारागृहातील अंडासेलमध्ये शिक्षा भोगणाºया डॉन अरुण गवळी यानेही ही परीक्षा दिली. त्याला पुरविलेल्या साहित्यातून गांधीजींचे विचार आत्मसात केले आणि ही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. गांधीजींचे विचार हे अहिंसेचे आहेत, याच विचारांची भीती इंग्रजांनाही होती. अरुण गवळी याचे व्यक्तिमत्त्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, यातून दहशत निर्माण केली होती. आता परीक्षेच्या माध्यमातून का होईना हा डॉन गांधी विचाराशी जुळला आहे. मात्र, परीक्षा पास करणे आणि हे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे यात फरक आहे. चित्रपटात गांधी विचारांना आत्मसात करणारा ‘मुन्नाभाई’ बदलला, असाच बदल अरुण गवळीत होणार का?
तुरुंग फोडणा-या कैद्यांनीही मारली बाजी
३१ मार्च २०१५ च्या मध्यरात्री नागपूर मध्यवर्ती कारागृहातून मोक्काचे पाच कुख्यात कैदी कारागृह सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. या कैद्यांनी तेव्हा अख्खी पोलीस यंत्रणा हादरवून सोडली होती. हे कैदी सध्या नागपूर कारागृहात आहेत. त्यांनीही गांधी विचाराची परीक्षा दिली होती. तेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे.
गांधी विचार बंदिवानांसाठी लाभदायी
सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर आणि मुंबई सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी गांधी विचार परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा बंदिवानांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी तसेच आचारविचारात आमूलाग्र परिवर्तन घडवून आण्यासाठी लाभदायी ठरत आहे. त्यातून बंदिजनांच्या वागणुकीत सकारात्मक बदल घडत आहे.
-राणी भोसले, अधीक्षक, नागपूर कारागृह