तंबाखू खाणाऱ्यांना गांधीगिरीची शिक्षा
By admin | Published: March 6, 2015 12:01 AM2015-03-06T00:01:35+5:302015-03-06T00:01:35+5:30
मोटारीचा दरवाजा उघडून थुंकणाऱ्यांचा मोटार चालवण्याचा परवाना किमान महिनाभराकरिता रद्द केला जाईल, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले.
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळताना, पिचकारी मारताना महापालिका अधिकारी अथवा पोलिसांनी पकडले तर यापुढे रस्ता साफ करण्याची, जवळील रुग्णालयात रुग्णसेवा करायची शिक्षा भोगण्याची तयारी ठेवावी लागेल.
मोटारीचा दरवाजा उघडून थुंकणाऱ्यांचा मोटार चालवण्याचा परवाना किमान महिनाभराकरिता रद्द केला जाईल, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक अांदोलनाची कायम थट्टा करणाऱ्या शिवसेनेने तंबाखू चघळणाऱ्यांना वठणीवर आणण्याकरिता ‘गांधीगिरी’चा आधार घेतला आहे.
डॉ. सावंत म्हणाले की, तंबाखू चघळणारे, खाऊन थुंकणारे यांना दंड आकारून वठणीवर आणता येणे अशक्य आहे. त्यांना लाज वाटेल असे काही करण्याची गरज आहे. विदेशात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना साफ करायला लावण्याची शिक्षा केली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांना रस्ता साफ करायला लावणे किंवा तंबाखू चघळताना पकडल्यास जवळील रुग्णालयात नेऊन तास-दीडतास रुग्णसेवा करायला लावण्यासारखी शिक्षा केली तर तंबाखू खाण्याचे प्रमाण बरेच कमी होईल, असा विश्वास वाटतो. राज्य सरकारच्या विधि व न्याय विभागाने हा प्रस्ताव कायद्याच्या चौकटीत बसवून द्यावा, असे सांगण्यात आले आहे.
मोटारीचा दरवाजा उघडून रस्त्यावर थुंकण्याची सवय अनेक ठिकाणी पाहायला मिळते. अशा पिचकारी बहाद्दरांना धडा शिकवण्याकरिता त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा विचार सुरु आहे. याबाबतचा प्रस्तावही विधि व न्याय विभाग तपासून पाहत आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळणे, थुंकणे यावर बंदी घालण्याची घोषणा सरकारने केल्यापासून राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी तंबाखू सोडली असून शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही आपली भेट घेऊन तंबाखू सोडल्याचे सांगितले, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)