गांधीगिरी : जालन्यात खराब सोयाबीन-कपाशीचे बुके देऊन केले अधिकाऱ्यांचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 05:49 PM2019-11-05T17:49:56+5:302019-11-05T17:56:08+5:30
मराठा महासंघाच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी पिकाची पाहणी करण्यासाठी गावात आलेल्या अधिकाऱ्यांचे खराब झालेले सोयाबीन आणि कपाशीच्या झाडांचे बुके देऊन स्वागत केले. तसेच लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली.
जालना - राज्यभरात परतीच्या पावसाने कहर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या परिस्थितीत शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला असून सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शासन आणि प्रशासन कागदी घोडे नाचवण्यातच वेळ घालवत असल्याचा आरोप करत मराठा महासंघाने आक्रमक पावित्रा घेतला आहे.
जालना जिल्ह्यातील कारला गावात मंगळवारी तलाठी आणि कृषीअधिकारी नुकसानग्रस्त भागातील पिकांचा पंचनामा करण्यासाठी आले होते. त्यावेळी मराठा महासंघाच्या वतीने अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांना थेट मदत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा छळ थांबवून कागदीघोडे नाचवणे बंद करावे अशी मागणी मराठा महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश देशमुख यांनी केली.
दरम्यान मराठा महासंघाच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी पिकाची पाहणी करण्यासाठी गावात आलेल्या अधिकाऱ्यांचे खराब झालेले सोयाबीन आणि कपाशीच्या झाडांचे बुके देऊन स्वागत केले. तसेच लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. यावेळी पंचायत समिती सदस्य रामराव काळे, माजी सरपंच एकनाथ खरात, नवनाथ सरोदे आदी उपस्थित होते.