हेल्मेट वापरासाठी सेना करणार गांधीगिरी
By admin | Published: June 13, 2016 05:31 AM2016-06-13T05:31:19+5:302016-06-13T05:31:19+5:30
बाईक चालविताना हेल्मेट वापरण्याचा संदेश देण्यासाठी सोमवारी ‘गांधीगिरी’ करण्याचा इशारा शिव वाहतूक सेनेने दिला आहे.
मुंबई : वाहतूक नियमांचे पालन आणि बाईक चालविताना हेल्मेट वापरण्याचा संदेश देण्यासाठी सोमवारी ‘गांधीगिरी’ करण्याचा इशारा शिव वाहतूक सेनेने दिला आहे. ‘सर बचाओ, घर बचाओ’ या नावाने वाहतूक सेना विशेष अभियान राबविणार असून, यात विनाहेल्मट प्रवास करणाऱ्यांना हेल्मेट भेट देण्यात येणार आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे अभियान राबवण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि पुण्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाईल. दिवसभरात पाच हजार हेल्मेट वाटण्याचे आम्ही ठरविले आहे, असे शिवसेना उपनेते व वाहतूक सेना अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी सांगितले. या अभियानांतर्गत सर्व प्रमुख रस्ते-चौकात प्रत्येकी २५ शिवसैनिकांचे एक पथक आम्ही तैनात करणार आहोत. पुढील तीन-चार महिने हे अभियान चालणार असून, त्या माध्यमातून वाहतूक नियम व सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा आमचा उद्देश आहे, असेही शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)