Ganesh Mahotsav: जल्लोष बाप्पांच्या आगमनाचा, ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळपर्यंत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 06:45 AM2024-09-07T06:45:51+5:302024-09-07T06:47:10+5:30
Ganesh Chaturthi 2024: सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे शनिवारी आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे.
पुणे - सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे शनिवारी आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. घरगुती उत्सवांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सजविलेल्या दरबारात बाप्पा विराजमान होणार असल्याने शुक्रवारी दिवसभर महानगरांमधील बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करीत बाप्पांचे रात्री उशिरापर्यंत मंडळात आगमन झाले.
ब्रह्ममुहूर्त पहाटे ४:५० ते दुपारी १:५१
- श्रीगणेश व्रत प्रतिष्ठापना पूजन शनिवारी (दि. ७) पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत, तसेच मुख्य चतुर्थी तिथी महत्त्वाची म्हणून सायंकाळपर्यंत करता येणार आहे.
- ‘दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या माहितीनुसार, शनिवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना करता येईल.
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना मध्यान्हनंतरदेखील करता येऊ शकते.
यंदा गणेश चतुर्थी दि. ७ सप्टेंबरला असून, अनंत चतुदर्शी दि. १७ सप्टेंबरला आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव अकरा दिवस साजरा करता येणार आहे. श्रीगणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजन करण्यासाठी विशिष्ट नक्षत्र, वार, योग, विशिष्ट करण (भद्रा) तसेच राहुकाल, आदी वर्ज्य नाही. शिवालिखित आदी कोणतीही कोष्टके पाहण्याची गरज नाही.
कशी कराल श्रीगणेश प्रतिष्ठापना
आपल्या सोयीनुसार घरच्या घरीदेखील श्रीगणेशाची पूजा करता येऊ शकते. गणेशाची मूर्ती मखरात ठेवावी, बसण्यासाठी आसन किंवा पाट घ्यावा. श्रीगणेशाचे पूजन करताना शुचिर्भूत असावे, घरात वादविवाद न करता प्रसन्नपणे सर्वांनी एकत्र असावे, अशी माहिती ज्योतिर्विद राहुल मुलमुले यांनी दिली.
देवाला काहीही समर्पण करत असताना ते उजव्या हातानेच वाहावे. मूर्तीवर पाणी, पंचामृत, अर्घ्य वाहताना फुलाने किंवा दुर्वांनी वाहावे. वडीलधाऱ्यांपैकी एकाने पूजा सांगावी. प्रथम कपाळी तिलक धारण करून आचमन करावे. देवापुढे बसून पूजेला प्रारंभ करावा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः असा मंत्राेच्चार करावा. प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्यावे.