भाजीपाला शास्त्र परीक्षेत गणेश चौधरी ओबीसींमध्ये देशात प्रथम
By admin | Published: July 22, 2014 12:41 AM2014-07-22T00:41:51+5:302014-07-22T19:00:27+5:30
आचार्य पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी गणेश वासुदेव चौधरी याने ‘भाजीपाला शास्त्र’ या परीक्षेत इतर मागास प्रवर्गातून देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विषयातील आचार्य पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी गणेश वासुदेव चौधरी याने 'भाजीपाला शास्त्र' या परीक्षेत इतर मागास प्रवर्गातून देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. देशभरातून या विषयाच्या परीक्षेला ११८ विद्यार्थी बसले होते. केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत भारतीय संशोधन परिषदेच्यावतीने कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळामार्फत ही परीक्षा अखिल भारतीय स्तरावर घेतली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर या मंडळाकडून कृषी विषयातील शास्त्रज्ञांची निवड करण्यात येत असते. यासाठी 'कृषी शास्त्रज्ञ' (एआरएस) परीक्षेत पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीनही परीक्षेत इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून उत्तीर्ण व्हावे लागते. भारत तसेच नेपाळ आणि भूतान या देशातील कृषी पदव्युत्तर, पदवीप्राप्त विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास आयसीएआरच्या कार्यक्षेत्रात भारतातील कृषी संस्थेत कृषी शास्त्रज्ञ (भाजीपाला) म्हणून नेमण्यात येते.