गणेशोत्सवात एसटी सेवा कोलमडणार ?
By admin | Published: June 9, 2014 03:21 AM2014-06-09T03:21:46+5:302014-06-09T03:21:46+5:30
एसटी महामंडळाला मुंबई विभागात मोठ्या संख्येने चालकांची गरज असूनही त्याचा निकाल लावण्यावरून एसटी महामंडळाकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत
मुंबई : एसटी महामंडळाला मुंबई विभागात मोठ्या संख्येने चालकांची गरज असूनही त्याचा निकाल लावण्यावरून एसटी महामंडळाकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत. निकाल १५ दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांकडून नुकतीच पत्रकार परिषदेत देण्यात आली. मात्र भरती होणाऱ्या चालकांना प्रत्यक्षात कामावर रुजू होण्यास साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात मुंबई विभागाचा बोऱ्या तर वाजणार नाही ना, अशी चिंता एसटीच्या कार्यरत चालकांना लागून राहिली आहे.
एसटी महामंडळाने मुंबई विभागासाठी कनिष्ठ चालकांबरोबरच राज्यातील अधिकारी (तांत्रिक आणि अतांत्रिक) आणि पर्यवेक्षकीय पदासाठी ९ आणि २३ मार्चला परीक्षा घेतली. यात ६ हजार ५७५ विविध पदांसाठी १ लाख ५५ हजार १६३ उमेदवारच पात्र ठरले आणि त्यांनी परीक्षा दिली. महत्त्वाची बाब म्हणजे यात मुंबई विभागासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत २ हजार ८७६ कनिष्ठ चालकांची पदे भरली जाणार आहेत. मुंबई विभागात मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागाचा समावेश असून, यांना चालकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र असे असतानाही नुकताच प्रथम अवघे ११९ पदे असलेल्या एसटीतील अधिकाऱ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आणि आता त्यांच्या मुलाखतीचीही तयारी केली जात आहे. पण यात मोठ्या संख्येने असलेल्या चालकांचा निकाल लागण्यास एसटीकडून विलंब होत आहे. एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी चालकांचा निकाल १५ दिवसांत लावू असे आश्वासन दिले. मात्र हा निकाल जाहीर केल्यानंतर या चालकांना कामावर रुजू होण्यास साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे.
या चालकांचा निकाल लागल्यावर त्यांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाईल. चालकांची संख्या मोठी असल्याने ही चाचणी साधारण १५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस चालेल. ती पुण्यातील भोसरी येथील अत्याधुनिक ड्रायव्हिंग ट्रॅकवर घेतली जाईल. त्यानंतर चालकांनी दिलेल्या लेखी परीक्षेचे आणि या ड्रायव्हिंग चाचणीचे गुणांकन एकत्र करून त्याची यादी तयार केली जाईल. प्रत्येक विभागानुसार त्यांना बोलावले जाईल आणि त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.