‘स्वयम’मध्ये दिव्यांग मुले साकारतायत ‘ट्री गणेशा...’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 12:42 PM2017-08-04T12:42:21+5:302017-08-04T13:02:35+5:30
कोल्हापूर, दि. 4 - दिव्यांग मुलांना आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्वयम् उद्योग केंद्रात यंदा इको-फ्रेंडली गणेशमूर्तीतून ...
कोल्हापूर, दि. 4 - दिव्यांग मुलांना आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्वयम् उद्योग केंद्रात यंदा इको-फ्रेंडली गणेशमूर्तीतून ‘ट्री गणेशा’ साकारला जात आहे. संस्थेतर्फे प्रत्येक भक्ताला गणेशमूर्तीसोबत एका कुंडीत फळझाडांचे बी घालून देण्यात येणार आहे. विसर्जनानंतर गणेशमूर्तीची माती या कुंडीत घातल्यानंतर त्यातून रोप उगवेल, अशी या ‘ट्री गणेशा’मागील संकल्पना आहे.
न्यायालयाच्या मागील बाजूस साकारण्यात आलेल्या नव्या इमारतीत इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्वयम् उद्योग केंद्रातील मुले सध्या लाडक्या गणरायाला घडविण्यात व्यस्त आहेत. एरवी या दिव्यांगांच्या क्षमतांकडे दुर्लक्ष केले जात असताना त्यांचे निरागस हात अत्यंत बारीक कलाकुसरीने श्री गणेशाची मूर्ती साकारत असताना पाहणे हा अतिशय सुखद अनुभव आहे.
साधी माती आणि शाडूची माती एकत्र करून ही मुले इको-फ्रेंडली गणेशमूर्ती साकारतात. माती चाळण्यापासून ती मळणे, चेचणे, साच्यामध्ये भरणे, वाळल्यानंतर मूर्ती साच्यामधून काढणे, घासकाम, मूर्तीला रेखीवता आणणे, अलंकारांची कलाकुसर, रंगकाम ही सगळी कामे संस्थेतील बारा दिव्यांग मुले करीत आहेत. त्यांना व्यवसायप्रमुख जयसिंग पाटील, कलाकार बाजीराव माने, अशोक मिस्त्री, केशव लाटवले यांचे सहकार्य मिळते आणि मुख्याध्यापक प्रमोद भिसे यांचे मुलांकडे वैयक्तिक लक्ष असते.
अन्य कलाकारांच्या तुलनेत दिव्यांगांच्या कामाची गती संथ असते; त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सव संपल्यानंतर दोन महिन्यांनी लगेचच गणेशमूर्ती घडविण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून, संस्थेतर्फे शंभरहून अधिक मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. त्यांत दगडूशेठ, आजोबा गणपती, पाटील गणपती, लालबागचा राजा, सिंहासनारूढ गणेश अशा विविध रूपांतील गणेशमूर्तींचा समावेश आहे.
यंदाच्या वर्षी या इको-फ्रेंडली गणेशमूर्तींसोबतच ‘ट्री गणेशा’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. भाविकांच्या हाती गणेशमूर्ती सोपविताना एका कुंडीत बी घालून देण्यात येणार आहे. घरगुती गणेशमूर्तीचे घरात विसर्जन करून ही माती दिलेल्या कुंडीत भाविकांनी घालायची. या बीमधून उगवणारे रोप म्हणजे ट्री गणेशा. त्यासाठी झेंडू, दोडका, भेंडी अशा फळझाडांच्या बिया संकलित करण्यात आल्या आहेत.
संस्थेत एकूण १२० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांपैकी १८ ते ४० वयोगटातील पन्नास मुले-मुली उद्योग केंद्रासाठी काम करतात. त्यांत फुलदाणी बनविणे, फायली, दिवाळी भेट, आकाशकंदील, आकर्षक दिवे, चित्र, कागदी पिशव्या, राख्या अशा वेगवेगळ्या उद्योगांचा समावेश आहे.