नेत्री दोन हिरे, प्रकाश पसरे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2023 02:35 PM2023-08-13T14:35:32+5:302023-08-13T14:36:27+5:30
ठाण्यातील अनेक कारखान्यांत गणेशमूर्तीला अनेक रत्नांनी आणि अलंकारांनी सजवण्याचे काम सुरू आहे.
- प्रवीण शिंदे
लखलखणाऱ्या खड्यांमुळे गणेशमूर्तीला वेगळीच झळाळी मिळते. गणेशमूर्तीचा सोंडपट्टा, मुकुट, बाजूबंद, हातावर असलेल्या दागिन्यांतली कलाकुसर, त्यावर होणारे इमिटेशन वर्क यंदाही चर्चेचा विषय ठरत आहे. नवीन नक्षीकामांची इमिटेशन ज्वेलरी, चांदीच्या आभूषणांनी घरगुती गणेशमूर्तीसह सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती सजूनच मूर्तिशाळेतून रवाना होणार आहेत.
गेल्या काही वर्षांत सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाल्याने त्याला पर्याय म्हणून गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी इमिटेशन ज्वेलरीचा वापर होत आहे. किरीट, त्रिशूल, हातातील कडे, कमरपट्टा, उत्तरीय, भावलीवरील नक्षीकाम, तबक आदी प्रकारची आभूषणे आणि इमिटेशन ज्वेलरी वापरण्यात येत आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील मूर्तिकार सिद्धेश अरुण बोरीटकर यांच्या कारखान्यात गणेशमूर्तींना इमिटेशन ज्वेलरीने सजवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे साहित्य भायखळ्याच्या बाजारपेठेतून आणले जाते. गेल्या काही वर्षांत या इमिटेशन वर्कचे स्वरूप बदलत आहे. सुरुवातीला इमिटेशन वर्कचा ट्रेंड बाजारात आला, त्यावेळी कारागिरांकडून चमचमणाऱ्या खड्यांचा वापर अधिक होत होता. त्यानंतर वेगवेगळे रंगीबेरंगी कागद, वेल्वेट पेपर, ॲक्रॅलिक पेपरचा वापर वाढत गेला. आता नवनव्या थीम्ससाठी फोमचा वापर वाढत आहे.
गणेशमूर्तीच्या उंचीनुसार ज्वेलरी वापरली जात असून, त्यानुसारच कारागिरांचे मानधन ठरते. इमिटेशन ज्वेलरीमध्ये काम करणारे कारागीरही वेगळे असतात. इमिटेशन ज्वेलरीने सजवलेल्या गणेशमूर्ती महाग जरी असल्या, तरी त्या आकर्षक असल्याने त्यांना मागणीही भरपूर आहे. या वर्षी इमिटेशन ज्वेलरीच्या गणेशमूर्तीच्या सुमारे ८०० ते एक हजारच्या आसपास ऑर्डर आल्याची माहिती बोरीटकर यांनी दिली. यंदाही इमिटेशन ज्वेलरीने सजवलेल्या गणेशमूर्ती ठाण्यासह मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान आणि रत्नागिरीमध्ये रवाना होणार आहे.
या गणेशमूर्तींना सर्वाधिक मागणी
पुण्यातील दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, टिटवाळा गणेशमूर्ती आणि विठ्ठलाच्या गणेशमूर्तींना सर्वाधिक मागणी आहे. गणेशमूर्ती सजविण्यासाठी काचेचे खडे, चमक तसेच धोतर व फेट्यासाठी रंगीबेरंगी लेस आणि साखळ्यांचा वापर करण्यात येतो. कारागीर संजय पंधारे, नागेश सुतार, चिन्मय आब्रे आणि मनिष पांचाळ यांच्याकडून गणेशमूर्तींना सजविण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. दिवसभरात एक कारागीर दीड ते दोन फुटांपर्यंत दोन, तर तीन फुटांपर्यंत एक गणेशमूर्ती सजवत असल्याची माहिती ज्येष्ठ मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी दिली.
आमच्या कार्यशाळेत गणेशमूर्तीचा हार, बाजूबंद, बांगड्या, मुकुट, कर्णफुले आणि पैंजण इमिटेशन ज्वेलरीने सजविली जातात. तसेच गणेशाचे धोतर, शाल आणि फेटा रंगीबेरंगी लेसने सजविले जाते. या वर्षी ४० ते ५० गणेशमूर्तींची बुकिंग झाली आहे. इमिटेशन ज्वेलरीचे साहित्य असल्यास कारागीर सुमारे ६०० रुपये घेतो, तर आम्ही इमिटेशन ज्वेलरी साहित्य पुरविल्यास कारागीर साधारण ३५० ते ४०० रुपये घेतो. यासाठी कोणतेही प्रशिक्षण नसून अनुभवातूनच शिक्षण मिळते. - सचिन कुंभार, विहान आर्ट्स.