“गणेश नाईकांसारख्या 'कर्म दरिद्री' लोकांमुळे कल्याण-डोंबिवलीमधून राष्ट्रवादी संपली”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 10:59 AM2020-03-08T10:59:42+5:302020-03-08T11:04:27+5:30
गणेश नाईक यांनी 30 वर्ष फक्त आपले खिसे भरण्यासाठी राजकरण केलं.
मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आत्तापासूनच तयारी सुरु झाली असून, पक्षाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून कोपरखैरणे येथे सभा आयोजित करण्यात आली होती. तर या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. गणेश नाईकांसारख्या 'कर्म दरिद्री' लोकांमुळे कल्याण-डोंबिवलीमधून राष्ट्रवादी संपली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
आव्हाड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडे माझ्याबद्दलची जाणीवपूर्वक खोटी माहिती पुरवली. नाईक यांना माहित होते आपली औकात संपली असून, आपण मीरा-भायंदर, ठाणे, नवी मुंबई येथून मागे पडू आणि निवडून येणार नाही. त्यामुळे निवडून येण्याची खात्री नसल्याने फक्त मला बदनाम करण्यासाठी नाईक यांनी पवारांना माझ नाव सांगितेले असल्याचं आव्हाड म्हणाले.
तर आम्ही मेहनत करून उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष नाईक यांनी संपवून टाकला. जेव्हा कल्याण- डोंबिवलीमध्ये आमचा महापौर होता, त्यावेळी नाईक कुठेच नव्हते. मात्र नाईक राष्ट्रवादीत आले आणि कल्याण- डोंबिवलीमधुन त्यांनी राष्ट्रवादी संपवून टाकली. डोंबिवलीमधुन मी 9 नगरसेवक निवडून आणले होते, मात्र त्यांनी ते 1 वर आणले असल्याचा आरोपही आव्हाडांनी यावेळी केला.
गणेश नाईक यांनी 30 वर्ष फक्त आपले खिसे भरण्यासाठी राजकरण केलं. तर गणेश नाईक यांच्यामुळे अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच नवी मुंबईतील कारखाने, दगडखाणींकडून ते खंडणी वसूल करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला.